पंजाबमधील प्रसिद्ध गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला यांच्यावर मानसा जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी मुसा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मुसेवाला यांचे हजारो चाहते तसेच राजकीय, मनोरंजन क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या. मुसेवाला यांच्या चाहत्यांनी अंत्यसंस्कारावेळी पंजाबमधील आप सरकारविरोधात घोषणाबाजी करत आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली. मुलाला शेवटचा निरोप देताना मुसेवाला यांच्या आई-वडिलांना दु:ख अनावर झाले.
हेही वाचा >>> प्रशांत किशोर यांची काँग्रेसवर सडकून टीका; म्हणाले “…तेव्हापासून ठरवलं सोबत काम करणार नाही”
मानसा जिल्ह्यातील आपल्या गावी जात असताना मुसेवाला यांच्यावर २९ मे रोजी गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात मुसेवाल यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आता शवविच्छेदन झाल्यानंतर मुसेवाला यांच्यावर मानसा जिल्ह्यातील त्यांच्या मूळ मुसा या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित होते. तसेच गायक गुरुदास मान, पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष अमरिंदर सिंग राजा वारिंग, आमदार सुखजिंदर रणधावा आदींनी मुसेवाला यांना शेवटचा निरोप दिला.
हेही वाचा >>> ठरलं! हार्दिक पटेल भाजपात प्रवेश करणार; २ जून रोजी पक्षप्रवेश सोहळा
दरम्यान, मुसेवाला यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु आहे. मात्र अद्याप पोलिसांच्या हाती ठोस काही लागलेले नाही. तसेच संशयितांना अद्याप अटक करण्यात आलेले नाही. तर दुसरीकडे या हत्येची जबाबदारी कॅनडास्थित गँगस्टर गोल्डी ब्रारने घेतली आहे. गोल्डी हा दिल्लीच्या तिहार जेलमध्ये असणारा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा साथीदार मानला जातो. या संपूर्ण प्रकरणाचा तपास पंजाब पोलीस करत आहेत.