सुप्रसिद्ध पंजाबी गायक तसेच काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्यानंतर एकच खळबळ उडाली असून पंजाबमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. राजकीय क्षेत्रातूनही संताप व्यक्त केला जात आहे. असे असतानाच सिद्धू मुसेवाला यांच्या आईने आपल्या मुलाच्या मृत्यूला राज्य सरकारला जबाबदार धरले आहे.
हेही वाचा >> Video : जगप्रसिद्ध मोनालिसा पेंटिंग धोक्यात! महिलेचा वेश धारण करत कलाकृतीला विद्रूप करण्याचा प्रयत्न
सिद्धू मुसेवाला हे पंजाबमधील प्रसिद्ध गायक आणि काँग्रेसचे नेते होते. त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यांची २९ मे रोजी कॅनडास्थित गँगस्टर गोल्डी ब्रार याने गोळ्या झाडून हत्या केली. या गोळीबारामध्ये मुसेवाला यांचा मृत्यू झाल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. मुसेवाला यांच्या आईनेदेखील मुलाच्या मृत्यूनंतर प्रतिक्रिया व्यक्त करत पंजाब सरकारला जबाबदार धरले आहे. माझ्या मुलाला न्याय मिळायला हवा, अशी मागणी सिद्धू मुसेवाला यांची आई तसेच कुटुंबीय आणि नातेवाईकांनी केली आहे. याबाबतचे वृत्त इंडिया टुडे या इंग्रजी वृत्तसंकेतस्थळाने दिले आहे.
हेही वाचा >> सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येचे कारण आले समोर; कॅनडातल्या गँगस्टर गोल्डी ब्रारने स्वीकारली जबाबदारी
एकीकडे सुद्धू मुसेवाला यांच्या आईने पंजाब सरकारला जबाबदार धरले आहे. तर दुसरीकडे पंजाबचे मुख्यमंत्री तथा आपचे नेते भगवंत मान यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. तसेच या हत्येमध्ये सहभागी असलेल्या कोणाचीही गय केली जाणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनीदेखील पंजाबमध्य शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. “सिद्धू मुसेवाला यांची हत्या ही धक्कादायक आणि दुखद आहे. मी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याशी याबाबत चर्चा केली आहे. गुन्हेगारास कठोरातील कठोर शिक्षा देण्यात येईल. मी प्रत्येकाला शांतता राखण्याचे आवाहन करतो,” असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.