Pushpa 2 Stampede Updates : अभिनेता अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांचा पुष्पा २ चित्रपट डिसेंबरच्या सुरुवातीला सर्वत्र प्रदर्शीत झाला आहे. चित्रपट प्रदर्शीत झाल्यापासून तो सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रीमियर दरम्यान हैदराबादमधील एका चित्रपटगृहात चेंगराचेंगरी झाली होती. त्यात एका महिलेचा मृत्यू झाला होता. तर तिचा मुलगा गंभीर जखमी झाला होता. अशात पीडित महिलेच्या पतीने द्रददावक माहिती समोर आणली आहे. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या महिलेच्या मुलीला, तिच्या आईचे निधन झाल्याचे अजूनही सांगण्यात आले नाही. याबाबत पीडितेच्या पतीने माहिती दिली आहे. याचबरोबर चित्रपटगृहातील चेंगराचेंगरीत गंभीर जखमी झालेल्या त्यांचा मुलगा अजूनही कोमात असल्याचेही त्यांनी सांगितले.
आईचे निधन…
या चेंगराचेंगरीत मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे पती या संपूर्ण प्रकरणावर बोलताना म्हणाले, “त्यांच्या मुलीला आईचे निधन झाल्याचे अजूनही माहिती नाही. काय घडले आहे, याची तिला कोणतीही कल्पना नाही. आम्ही तिला, आई गावाला गेली असल्याचे सांगितले आहे. आमचा मुलगा गेल्या २० दिवसांपासून कोमात आहे. त्याने डोळे उघडले होते, पण कोणालाही ओळखू शकला नाही. त्याच्यावर आणखी किती दिवस उपचार चालणार याचीही कल्पना नाही.” चित्रपटगृहातील चेंगराचेंगरीत मृत्यूमुखी पडलेल्या महिलेच्या पतीने एनडीटीव्हीशी बोलताना ही माहिती दिली आहे.
अल्लू अर्जुलना अटक आणि सुटका
४ डिसेंबरला हैदराबादमध्ये आयोजित केलेल्या पुष्पा २ चित्रपटाच्या प्रीमियर वेळी संध्या थिएटरमध्ये चेंगराचेंगरी झाली होती. या चेंगराचेंगरीत एका वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. तर या महिलेचा मुलगा गंभीर जखमी झाला होता. हा जखमी झालेला मुलगा सध्या रुग्णालयात असून त्याची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी पोलिसांनी अभिनेता अल्लू अर्जुन, संध्या थिएटर व्यवस्थापन आणि अल्लू अर्जुनच्या सुरक्षा पथकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर अल्लू अर्जुनला अटक झाली होती. एका दिवसानंत तेलंगणा उच्च न्यायालयाने त्याला जामीन मंजूर करत सुटका केली होती.
दरम्यान चित्रपटगृहात झालेले चेंगराचेंगरी प्रकरण अजूनही तापलेले आहे. याविरोधात तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तर एमआएमचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनीही अल्लू अर्जूनवर गंभीर आरोप केले आहेत. अशात काल काही लोकांनी अल्लू अर्जुनच्या घरावर हल्लाही केला होता.