Pushpa 2 Madhya Pradesh Gwalior : देशभरात सध्या पुष्पा २ चित्रपट गाजत आहे. दरम्यान ५ डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या अल्लू अर्जुनच्या या चित्रपटामुळे अनेक वादही झाल्याचे पाहायला मिळाले. अशात आता मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ग्वाल्हेरमधील एका चित्रपटगृहाच्या कॅन्टीन मालकाने पुष्पा २ चित्रपट पाहायला आलेल्या प्रेक्षकाच्या कानाचा चावा घेतल्याचा आरोप आहे. याबाबत पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय आहे नेमकं प्रकरण?

या प्रकरणातील पीडित ग्वाल्हेरमधील एका चित्रपटगृहात पुष्पा २ पाहायला गेला होता. चित्रपटाचा मध्यांतर झाल्यावर पीडित उपहार गृहातून काही खाद्यपदार्थ आणायला गेला. त्यावेळी पीडित आणि उपहारगृहाच्या मालकामध्ये पैशांवरून वाद झाला. हा वाद इतका वाढला की, या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. हा सर्व प्रकार सुरू असताना उपहारगृहाच्या मालकाने पीडित प्रेक्षकाच्या कानाला लचका तोडला. यावेळी उपहारगृहाचा मालक आणि त्याच्या तीन साथीदारांनी पीडिताला जीवे मारण्याची धमकीही दिली. दरम्यान हा सर्व प्रकार खाद्य पदार्थांच्या पैशाच्या वादातून घडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

एक हजार कोटींची कमाई

अल्लू अर्जुनची प्रमुख भूमिका असलेल्या पुष्पा २ चित्रपटाने प्रदर्शित झाल्यापासून जगभरात आतापर्यंत एक हजार कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाला सर्वत्र प्रतिसाद मिळत आहे. सुकुमार यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट, पुष्पा चित्रपटाचा पुढचा भाग आहे. ५ डिसेंबर रोजी पुष्पा २ चित्रपट हिंदी, तमिळ, कन्नड, बंगाली आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित झाला होता.

हे ही वाचा : “मला जनावरासारखे वागवले…”, काय आहेत अतुल सुभाष यांच्यावर पत्नी निकिताचे आरोप?

चित्रपटगृहात विषारी गॅस

यापूर्वी ६ डिसेंबर रोजी मुंबईतील वांद्रे येथील गॅलेक्सी चित्रपटगृहात पुष्पा २ सुरू असताना अज्ञात व्यक्तीने विषारी गॅसची फवारणी केली होती. यामुळे अनेक प्रेक्षकांना खोकला, घशात जळजळ आणि उलट्या झाल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले होते. या संपूर्ण प्रकरणानंतर चित्रपटाचे प्रक्षेपण काही वेळासाठी थांबवण्यात आले होते.

हैदराबादमध्ये महिलेचा मृत्यू

पुष्पा २ चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी ४ डिसेंबरला हैदराबादमध्ये प्रीमियर शो चे आयोजन करण्यात आले होते. यासाठी अभिनेता अल्लू अर्जुन येणार म्हणून प्रेक्षकांनी तिथे मोठी गर्दी केली होती. दरम्यान अल्लू अर्जुन येताच त्याची झलक पाहण्यासाठी प्रेक्षकांची धावपळ सुरू झाली. यामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत एक महिलेचा मृत्यू झाला, तर तिचा मुलगा जखमी झाला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pushpa 2 theatre canteen owner bites ear man food bill madhya pradesh gwalior aam