Bengaluru Techie run from his wife: कौटुंबिक छळाला कंटाळून बंगळुरूमध्ये आयटी कंपनीत नोकरी करणाऱ्या एका ३७ वर्षीय पतीने दहा दिवसांपूर्वी घरातून पळ काढला होता. आपला नवरा बेपत्ता झाल्यानंतर पत्नीने पोलिसांत तक्रार दाखल करून त्याचा शोध घेण्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट टाकली होती. त्यानंतर दहा दिवस बंगळुरू पोलीस बेपत्ता असलेल्या विपिन गुप्ता (वय ३७) यांचा शोध घेत होते. अखेर गुप्ता नोएडामधील एका मॉलबाहेर आढळून आले. आपल्या जुन्या मोबाइलमध्ये नवे सीम कार्ड टाकल्यानंतर पोलिसांना गुप्ताचे लोकेशन प्राप्त झाले होते. मात्र गुप्ता यांना शोधल्यानंतर पोलिसांना धक्का बसला. गुप्ता यांना घरी जायचेच नव्हते.
४ ऑगस्ट रोजी विपिन गुप्ता बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या पत्नीने बंगळुरूच्या कोडीगेहळ्ळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार, पोलिसांनी बस स्टँड, रेल्वे स्थानक आणि विमानतळावरील अनेक सीसीटीव्ही कॅमेरे तपासले मात्र त्यांच्या हाती विपिन गुप्ता यांचे कोणतेही धागेदोरे लागत नव्हते.
बुधवारी (दि. १४ ऑगस्ट) विपिन गुप्ता यांनी नोएडा येथील मॉलमधून नवे सीम कार्ड घेतले. जुन्या मोबाइलमध्ये सीम कार्ड टाकतच बंगळुरूतील पोलिसांना त्यांचे लोकेशन प्राप्त झाले. पोलिसांनी लागलीच नोएडा गाठून विपिन यांचा माग काढला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गुप्ताला पकडण्याचा प्रसंग सांगितला. ते म्हणाले, “आम्ही तिघांनी विपिनच्या समोर जाताच त्याला समजले की, आम्ही साध्या वेशात पोलिसच आहोत. त्याने आमच्याकडे पाहून स्मितहास्य केले आणि म्हणाला आता पुढे काय? त्याला आम्ही म्हणालो की, आता बंगळुरूला परत जावे लागेल. त्यावर त्याने साफ नकार दिला.”
तुरूंगात टाका, पण पत्नीकडे जाणार नाही
विपिन गुप्ताने बंगळुरूला परतण्यास साफ नकार दिल्यामुळे पोलिसांसमोर प्रश्नचिन्ह होते. काही तास त्यांची समजूत काढल्यानंतर गुप्ता बंगळुरूला येण्यास तयार झाले. त्यांच्या पत्नीने दाखल केलेली तक्रार पोलिसांना हे प्रकरण निकाली काढायचे होते. गुप्ता यांनी पोलिसांनी विनंती करताना म्हटले, “तुम्ही मला तुरूंगात टाका. मी तिथे आनंदाने राहतो. पण मला पत्नीकडे परत जायचे नाही.”
हे ही वाचा >> Siddaramaiah : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या अडचणीत, जमीन घोटाळा प्रकरणात राज्यपालांनी दिली चौकशीला मंजुरी
शुक्रवारी सकाळी पोलीस आणि गुप्ता बंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. पोलीस स्थानकात गुप्ता यांचा जबाब नोंदवून घेतल्यानंतर त्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. चौकशी दरम्यान त्यांनी पत्नीकडून छळ होत असल्याचे म्हटले. पत्नीकडून सतत दबाव टाकला जातो, त्यामुळे मला मुक्तपणे जीवन जगता येत नाही, अशी कुचंबणा त्यांनी पोलिसांसमोर व्यक्त केली.