रशिया-युक्रेन युद्धाला दोन वर्ष झाल्यानंतरही या संघर्षातून काहीही तोडगा निघालेला नाही. या संघर्षादरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टेलिफोनद्वारे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी चर्चा केली. या संभाषणात दोन्ही नेत्यांनी रशिया-युक्रेन संघर्षातून मार्ग काढणे आणि युक्रेनला मानवतावादी मदत पुरविण्यावर चर्चा केली. दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित करणे आणि या संघर्षाला लवकरात लवकर संपविण्यासाठी भारत प्रयत्नशील असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले. या संभाषणाती माहिती पंतप्रधान मोदी यांनी स्वतः आपल्या एक्स अकाऊंटवर दिली आहे. तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशीही मोदींची चर्चा झाल्याचे एएनआय वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये सांगितले, भारत-युक्रेन या देशातील भागीदारी आणखी बळकट करण्याबाबत राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी चर्चा केली. सध्या सुरू असलेल्या संघर्षाला लवकर संपवून शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत अविरत प्रयत्न करत आहे, असे त्यांना सांगितलं. भारत यापुढेही युक्रेनला मानवतावादी मदत पुरवत राहिल, असे आश्वस्त केले.
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशीही चर्चा
झेलेन्स्की यांच्याशी चर्चा होण्याआधी पंतप्रधान मोदी यांनी व्लादिमिर पुतिन यांच्याशीही बातचीत केली. यावेळी पुतिन यांच्या पाचव्या कार्यकाळासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच रशिया-युक्रेन संघर्षातून मार्ग काढण्याबाबत पुढे जाण्यासंदर्भात सुतोवाच केले.