भारतात पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या आधी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचं मोठं वक्तव्य समोर आलं आहे. आपल्या मित्रांना सगळं यश मिळेल अशी आशा आहे असं त्यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली आणि मॉस्को यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध जसे होते तसेच अबाधित राहतील असंही पुतिन यांनी म्हटलं आहे. रशियाचे राष्ट्रपती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच त्यांना रशिया भेटीचं निमंत्रणही दिलं आहे. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांच्याबरोबर झालेल्या बैठकी दरम्यान त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुतिन यांनी रशिया दौऱ्याचं निमंत्रण दिलं आहे. पुतिन यांनी हेदेखील म्हटलं आहे की युक्रेन बाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मला वारंवार सल्ले दिले. तसंच काय परिस्थिती आहे ते त्यांनी फोनवरुन जाणून घेतलं. शांततेच्या मार्गाने हा प्रश्न कसा सोडवायचा या प्रयत्न नरेंद्र मोदी करत आहेत हे मला ठाऊक आहे असंही पुतिन यांनी म्हटलं आहे.
हे पण वाचा- UPSC-MPSC : भारत-रशिया संबंध; द्विपक्षीय व्यापार अन् सहकार्याची क्षेत्रे
जगभरात काही उलटसुलट गोष्टी चालल्या आहेत. अनेक गोष्टींमुळे परिस्थिती काहीशी बिकट आहे याची मला कल्पना आहे. तरीही आशियातला सच्चा दोस्त असलेल्या भारताशी आमचे संबंध चांगले आहेत आणि यापुढेही चांगले राहतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मी रशिया दौऱ्याचं निमंत्रण देतो आहे. जर ते रशियात आले तर आम्हा सगळ्यांनाच आनंद होईल असंही पुतिन यांनी म्हटलं आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना निवडणुकीतल्या यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. पुतिन म्हणाले की भारतात पुढच्या वर्षी निवडणूक होणार आहे. आमचे मित्र नरेंद्र मोदी यांना मोठं यश मिळेल अशा त्यांना मी शुभेच्छा देतो. तसंच दोन्ही देशांमधले मैत्रीपूर्ण संबंध अबाधित राहतील असंही त्यांनी म्हटलं आहे.