युक्रेनमध्ये असलेल्या रशियन नागरिकांचे आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे हे आमचे कर्तव्य आहे. त्यात जराही हयगय होऊ दिली जाणार नाही आणि त्यासाठी शक्य त्या ‘सर्व साधनांचा’ वापर करायला रशिया कचरणार नाही, अशी आपली भूमिका रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी स्पष्ट केली. मात्र त्याच वेळी, युद्ध हा आपल्यासमोरील सर्वात शेवटचा पर्याय असेल, असेही त्यांनी नमूद केले. अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री जॉन केरी हे तातडीने युक्रेनच्या दौऱ्यावर येत असल्यामुळे, रशियन फौजांनी आपल्या तळावर परतण्याचे आदेशही पुतिन यांनी दिले.
तत्पूर्वी, युक्रेनच्या मुद्दय़ावरून जगभरातील नेत्यांमध्ये खलबते सुरू झाली. रशियाने युक्रेनच्या सार्वभौमत्त्वाचा केलेला भंग, संभाव्य युद्धाचा आणि त्यातून उद्भवणाऱ्या ऊर्जासाधनांच्या तुटवडय़ाचा धोका, रशियाला प्रत्यक्ष युद्धापासून कसे रोखायचे यावर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेसह सर्वच प्रमुख आंतरराष्ट्रीय संघटनांनी पर्यायांची चाचपणी सुरू केली आहे. दरम्यान,  सध्या युक्रेनमध्ये सुमारे १६ हजार रशियन सैनिक दाखल झाले असल्याची माहिती युक्रेनतर्फे संयुक्त राष्ट्रांना देण्यात आली.
अशीही पंचाईत, तशीही पंचाईत..
युक्रेनविरोधात युद्ध छेडणाऱ्या रशियावर कठोर आर्थिक र्निबध लादण्याची भाषा पाश्चिमात्य राष्ट्रे करीत असली तरी असे केले तर अमेरिकेतील बँकांकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते फेडण्यास रशिया आपली असमर्थता व्यक्त करेल, अशी माहिती पुतिन यांच्या निकटवर्तीयांनी दिली. विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांतील घडामोडींमुळे, रशियाचे रुबल हे चलन डॉलर आणि युरोच्या तुलनेत आधीच घसरले आहे.
रशियन सैन्याकडून हवेत गोळीबार
क्रिमियातील बेल्बेक विमानतळावर असलेल्या रशियाच्या सैन्याने, तेथे असणाऱ्या युक्रेनच्या सैनिकांच्या संचलनाच्या पाश्र्वभूमीवर, हवेत गोळीबार केला. तसेच, युक्रेनच्या दोन युद्धनौकाही रशियाच्या नौदलाने रोखून धरल्या.

पेचप्रसंगामुळे ‘युरो’ रोडावला
युक्रेनमध्ये उद्भवलेल्या राजकीय अनिश्चिततेचे आणि लष्करी कारवाईचे परिणाम युरो या चलनावर झाले. गुंतवणूकदारांनी आणि खरेदीदारांनी युरोपेक्षा डॉलर आणि येन या चलनांना अधिक पसंती दिल्याचे दिसून आले.

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतही चर्चा
रशियाने फौजा पाठविण्याचा घेतलेला निर्णय अयोग्य आणि अन्याय्य असल्याची टीका सुरक्षा परिषदेत करण्यात आली, मात्र रशियाने हे आरोप स्पष्ट शब्दांत धुडकावून लावले. युक्रेनचे माजी अध्यक्ष व्हिक्टर यानुकोविच यांनीच रशियाला पत्र पाठवले होते आणि ‘संभाव्य विनाश टाळण्यासाठी लष्करी हस्तक्षेप करावा’, अशी विनंती केली होती, अशी माहिती या वेळी रशियाचे राजदूत वितली चुरकिन यांनी परिषदेस दिली.

मिझो नागरिकांचे रक्षण व्हावे
युक्रेनमध्ये उद्भवलेल्या पेचप्रसंगात तेथे असलेल्या मिझोरामच्या रहिवाशांच्या सुरक्षेकडे सरकारने लक्ष द्यावे, अशी विनंती मिझोरामच्या मुख्यमंत्र्यांनी भारतीय परराष्ट्र मंत्र्यांना केली आहे.

Story img Loader