रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यासाठी अमेरिका आणि पाश्चात्य देश रशिया आणि त्याचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या विरोधात एकवटत असले तरी असेही अनेक देश आहेत जे अप्रत्यक्षरीत्या रशियासोबत आहेत किंवा त्यांना समर्थन देत आहेत. पुतिन यांच्या सहकाऱ्यांबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये पहिले नाव येते ते म्हणजे बेलारूस देशाचे राष्ट्रपती अलेक्झांडर लुकाशेन्को यांचे. रशियाकडून हल्ल्याची घोषणा होताच त्यांनी आपल्या देशाच्या सीमा पुतिन यांच्या रणगाड्यांसाठी खुल्या केल्या होत्या. याचदरम्यान बेलारूसच्या राष्ट्रपतींचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे ज्याचे प्रसारण सरकारी वृत्तवाहिनीवर करण्यात आले होते. युक्रेनवर विजय मिळवल्यानंतर रशिया आणि पुतिन यांचे पुढील लक्ष्य मोल्दोव्हा असेल, असे या व्हिडीओवरून सांगितले जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मेल ऑनलाइनमध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्टनुसार, आतापर्यंतच्या लढाईत जरी बेलारूस थेट समोर आला नव्हता. मात्र अलीकडेच युक्रेनच्या गुप्तचर संस्थेने बेलारूस त्यांच्या देशाविरुद्धच्या युद्धात उघडपणे उतरल्याचा दावा केला आहे. बेलारूसचे ३०० रणगाडे तैनात असून त्यांची लढाऊ विमानेही आकाशात फिरत आहेत. यावरून असे दिसून येते की बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी सूचित केले आहे की व्लादिमीर पुतिन यांचे सैन्य पुढील टप्प्यात मोल्दोव्हावर हल्ला करण्याच्या तयारीत आहे.

खेळांमधून हद्दपार केल्यानंतर आता मनोरंजन बंदी!; रशियासंदर्भात Disney, Sony Picturesचा मोठा निर्णय

अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी आपल्या सुरक्षा अधिकार्‍यांसोबत एक महत्त्वाची बैठक घेतली, यात त्यांनी युद्धाचा नकाशा दाखवून आपली रणनीती जाहीर केली. यादरम्यान ते लष्करी कारवायांवर चर्चा करत आहेत. या नकाशामध्ये रशिया, बेलारूस, युक्रेन आणि काही युरोपीय देशांच्या सीमा आणि केंद्रे चिन्हांकित केली आहेत. लुकाशेन्को एका काठीच्या साहाय्याने नकाशावरील प्रत्येक मुद्द्याची माहिती देत ​​आहे. ही सर्व ठिकाणे आहेत जिथे रशियन सैनिकांनी कारवाई केली आहे आणि ते सतत पुढे जात आहेत.

व्हिडिओमध्ये त्यांनी हल्ल्यांशी संबंधित त्या खुणाही दाखवल्या, ज्यांना अद्याप रशियन हवाई दल किंवा लष्कराने लक्ष्य केले नाही. यादरम्यान, ओडेसा बंदर शहरापासून मोल्दोव्हाकडे निर्देशित करत असताना, ते काहीतरी चर्चा करतात, ज्यामुळे रशियाने भविष्यात युक्रेनच्या शेजारच्या भागांमध्ये आपले सैन्य कूच करण्याचे ठरवले आहे असा अंदाज वर्तविला जात आहे. मात्र, युक्रेनचे सैनिक आणि तिथले लोकही रशियन सैन्याशी जिद्दीने लढत आहेत. या हल्ल्याला सात दिवस उलटूनही रशियाला विशेष यश मिळालेले नाही. या बैठकीचे थेट प्रक्षेपण होत असल्याने, या चुकीमुळे पुतिन यांची युक्रेननंतरची पुढील योजना उघड झाल्याचे बोलले जात आहे.

Russia-Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धाच्या दरम्यान का होतेय व्लादिमीर पुतिन यांच्या टेबलची चर्चा?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, युक्रेनबाबत रशियाची आक्रमक वृत्ती अधिक तीव्र होत आहे. कीव काबीज करण्यासाठी रशियन सैन्य पुढे सरसावले आहे. या हल्ल्यात नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्याही वेगाने येत आहेत. अशा परिस्थितीत हे युद्ध किती काळ चालेल आणि त्याची झळ युरोपातील इतर कोणत्या देशांपर्यंत पोहोचेल, याचा अंदाज सध्या वर्तवला जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Putin next target will be this country belarus president mistakenly reveals secret pvp