सीरियाविरोधात लष्करी कारवाईसाठी अमेरिकेने दंड थोपटले असतानाच रशियाने अमेरिकेच्या या एकतर्फी निर्णयाला कडाडून विरोध केला आहे. अमेरिकेने सीरियावर हल्ला करण्याचा एकतर्फी निर्णय घेऊ नये, असे रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी बुधवारी सांगितले. मात्र सीरियाने त्यांच्याच नागरिकांना ठार करण्यासाठी रासायनिक अस्त्रांचा वापर केला असल्याचे सिद्ध झाल्यास त्यांच्यावर लष्करी कारवाई करण्याच्या संयुक्त राष्ट्रांच्या प्रस्तावाला आमचा पाठिंबा राहील, असेही पुतिन यांनी सांगितले.
रशियातील स्थानिक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी सीरियावर हल्ला करण्याचा एकतर्फी निर्णय अमेरिकेने घेऊ नये, असा इशारा दिला आहे. रशियाने यापूर्वी सीरियाला ‘एस-३००’ क्षेपणास्त्रे पुरवली होती. अमेरिकेने जर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा आयोगाच्या पाठिंब्याशिवाय सीरियावर हल्ला केल्यास रशिया सीरियाला शक्तिशाली क्षेपणास्त्रे पुरवू शकते, असा इशाराही पुतिन यांनी दिला.
रशियातील सेंट पीटस्बर्ग येथे गुरुवारपासून ‘जी-२०’ राष्ट्रांची परिषद सुरू होणार आहे. या परिषदेत सीरियाच्या मुद्दय़ावर चर्चा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांनी यापूर्वी रशियासोबतची बैठक रद्द केली होती, याबाबत नाराजी व्यक्त करीत पुतिन यांनी अमेरिका व रशिया यांच्यात सीरिया आणि इतर मुद्दय़ांवर चर्चा होण्याची आशा व्यक्त केली.
सीरिया सध्या देशांतर्गत बंडखोरांविरोधात लढत असतानाच आपल्याच नागरिकांना ठार करण्यासाठी रासायनिक अस्त्रांचा वापर कशासाठी करील? सीरियाचे अध्यक्ष बशर असद यांच्यावर करण्यात आलेला हा आरोपच हास्यास्पद आहे, असे पुतिन म्हणाले. असद यांनी रासायनिक अस्त्रांचा वापर केला आहे, याबाबतचे पुरावे असल्यास ते संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा आयोगाकडे सादर करावेत, असेही पुतिन यांनी सांगितले.
पोप यांचा विरोध
व्हॅटिकन सिटी : सीरियावर लष्करी कारवाई करण्यास पोप फ्रान्सिस यांनी विरोध दर्शवला आहे. लष्करी कारवाईने जागतिक शांततेत बाधा येईल. त्यामुळे त्याचा विरोधच केला पाहिजे, असे पोप फ्रान्सिस यांनी सांगितले. जागतिक शांततेसाठी व्हॅटिकन सिटी येथे शनिवारी उपवास आणि प्रार्थना करण्यात येणार असून त्यात ५० हजारांपेक्षा अधिक लोक सहभागी होणार असल्याचे पोप यांनी सांगितले.
अनागोंदी माजेल
संयुक्त राष्ट्रे : सीरियावर लष्करी कारवाई केल्यास या देशात आणखी अस्थिरता आणि अनागोंदी माजेल, असा इशारा संयुक्त राष्ट्रांचे सचिव बान की-मून यांनी बुधवारी दिला. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचा पाठिंबा नसतानाही रासायनिक अस्त्रांचा वापर करणाऱ्या सीरियावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, असेही मून यांनी सांगितले.
फ्रान्सचा पाठिंबा
सीरियावरील लष्करी कारवाईला आपला पाठिंबा असेल, असे फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री लॉरेंट फॅबिअस यांनी सांगितले. लष्करी कारवाईमुळे गेली अडीच वष्रे अशांत असलेल्या सीरियातील नागरी युद्धाची दिशा बदलू शकते, असे फॅबिअस यांनी सांगितले.
शिखर परिषदेसाठी पंतप्रधान रशियात
सेंट पीटर्सबर्ग:आठव्या जी-२० शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे बुधवारी येथे आगमन झाले. भारत आणि अन्य विकसनशील देशांच्या अडचणीत आलेल्या अर्थव्यवस्थेला अमेरिकेकडून मिळणाऱ्या अर्थसाह्य़ाला यापुढे मुकावे लागण्याचे संकेत मिळत असून ते टाळण्यासाठी एक समन्वयक योजना आखण्याचा आग्रह पंतप्रधान धरतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सीरियाच्या प्रश्नावरून रशिया आणि अमेरिका यांच्यात मतभेद निर्माण झाले असले तरी ते शिखर परिषदेत झाकोळले जाण्याची शक्यता आहे. मात्र त्याऐवजी अमेरिकेची अर्थसाह्य़ातून बाहेर पडण्याची योजना आणि भारत व अन्य ब्रिक्स देशांचा खालावलेला विकासदर यावर प्रकाशझोत टाकला जाण्याची शक्यता आहे.
ब्राझील, भारत, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका (ब्रिक्स) हे एकत्रित आले असून त्यांच्याकडे आर्थिक पर्याय म्हणून पाहिले जात आहे. हे सर्व देश शिखर परिषदेत सहभागी होणार असून खालावत चाललेला वृद्धिदर, चलनाची स्थिती याचा अनुभव सर्वानाच आहे.
विकसित देश आपल्या आर्थिक धोरणांपासून टप्प्याटप्प्याने बाजूला झाल्यास त्याचा विपरीत परिणाम विकसनशील जगावर होणार नाही, असे मत पंतप्रधानांनी शिखर परिषदेला रवाना होण्यापूर्वी एका निवेदनाद्वारे व्यक्त केले.
सीरियात भारतीय जिहादीही लढत आहेत!
शुभ्रजित रॉय (एक्स्प्रेस वृत्तसेवा), नवी दिल्ली
सीरियामध्ये सत्ताधाऱ्यांविरोधात बंडाळी करणाऱ्यांमध्ये भारतीय जिहादींचाही समावेश असल्याचा गौप्यस्फोट सीरियाचे भारतातील राजदूत रियाद अब्बास यांनी केला आहे. सीरियात सध्या अंतर्गत बंडाळी सुरू आहे. मात्र, या बंडाळीत अफगाण व चेचेन जिहादींचा भरणा अधिक आहे. त्यातच भारतीय मुस्लिम जिहादींचाही समावेश असल्याचे अब्बास यांनी स्पष्ट केले.
लष्कराशी झालेल्या धुमश्चक्रीत काही भारतीय जिहादी ठार झाले आहेत तर काहीजणांना जिवंत पकडण्यात लष्कराला यश आले असल्याचे अब्बास यांनी स्पष्ट केले. ठार झालेल्या आणि पकडलेल्या जिहादींची ओळख मात्र अद्याप पटलेली नाही. गेल्या दोन वर्षांत एकाही भारतीय अधिकाऱ्याने सीरियात दौरा केलेला नसल्यामुळे भारत सरकारशी या जिहादींच्या कारवायांचे पुरावे सादर करू शकलेले नसल्याचेही त्यांनी सांगितले.
जॉन केरी, हेगल यांचा सीरियावरील कारवाईला विरोध
वॉशिंग्टन : सीरियावर लष्करी कारवाई करण्याची तयारी अमेरिका करत असतानाच बराक ओबामा यांच्या प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनीच याला विरोध दर्शवला आहे. अशा प्रकारची कारवाई हे अमेरिकेचे चुकीचे पाऊल असेल आणि त्यामुळे केवळ दहशतवादाला चालना मिळेल, असा आरोप गृह सचिव जॉन केरी आणि संरक्षण सचिव चक हेगल यांनी केला आहे.
सीरियावरील हल्ल्याचा एकतर्फी निर्णय घेऊ नये
सीरियाविरोधात लष्करी कारवाईसाठी अमेरिकेने दंड थोपटले असतानाच रशियाने अमेरिकेच्या या एकतर्फी निर्णयाला कडाडून विरोध केला आहे.
आणखी वाचा
First published on: 05-09-2013 at 01:45 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Putin warns against syria strike us says credibility at stake