कोणत्याही खटल्यात आरोपीला दोषी ठरविण्यासाठी पुराव्यांचा दर्जा महत्त्वाचा असून, संख्या नाही, असे महत्त्वपूर्ण विश्लेषण सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी केले. 
कोणत्याही खटल्यात साक्षीदारांची संख्या किती आहे, यापेक्षा साक्षीदाराने नोंदविलेली साक्ष काय आहे, हे जास्त महत्त्वाचे आहे. निकाल देण्यापूर्वी किंवा कोणालाही दोषी ठरविण्यासाठी किमान एवढ्या साक्षीदारांची गरज आहे, असा कोणताही नियम आपल्याकडील कायद्यात नाही, असे न्या. बी. एस. चौहान आणि न्या. एस. ए. बोबडे यांच्या पीठाने स्पष्ट केले.
खटल्यातील साक्षीदाराने दिलेली साक्ष विश्वासार्ह आहे का, त्याला घटनेबद्दल किती नेमकेपणाने माहिती आहे, याच आधारावर न्यायाधीश साक्ष लक्षात घेत असतात. साक्षीदारांच्या आकड्याचा तिथे विचार केला जात नाही, असे पीठाने सांगितले. प्रत्येक साक्षीदाराने घटनेबद्दल काय माहिती दिली. कोणत्या मुद्द्यांवर त्याने प्रकाश टाकला, याचा विचार केला जातो, याकडेही सर्वोच्च न्यायालयाच्या पीठाने लक्ष वेधले. बिहारमधील एका नागरिकाने त्याला सुनावण्यात आलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावरील सुनावणीवेळी न्यायालयाने हे विश्लेषण केले.