एकाच दिवशी २०६ कोटी रुपयांच्या खरेदीसाठी २४ आदेश देण्याची ‘तत्परता’ दाखवून अडचणीत आलेल्या महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे अंगणवाडय़ांना  पुरविण्यात येणाऱ्या चिक्की व अन्य उत्पादनांच्या गुणवत्तेची चौकशी करण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. पंकजा मुंडे यांची पाठराखण केली असली तरी फडणवीस यांनी ‘चिक्की व अन्य उत्पादनांच्या गुणवत्तेच्या तक्रारीची चौकशी होऊ शकते,’ असे सांगून याप्रकरणी कुणालाही क्लिन चीट दिली नसल्याचे संकेत दिले. फडणवीस म्हणाले की, पंकजा मुंडे यांनी कोणताही गैरव्यवहार केलेला नाही. त्यांनी यापूर्वीच मला स्पष्टीकरण दिले आहे. प्राथमिक स्तरावर या प्रकरणात मला काहीही गैर दिसत नाही.
केंद्र सरकारच्या  शहरी विकासाच्या महत्त्वाकांक्षी योजनांच्या लोकार्पण कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी फडणवीस दिल्लीत आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्वतंत्रपणे भेट घेऊन त्यांनी नाशिकमध्ये होणाऱ्या सिहंस्थ कुंभमेळ्याचे निमंत्रण दिले.
पंकजा मुंडे यांच्याविषयी फडणवीस म्हणाले की, त्यांनी हे सर्व निर्णय फेब्रुवारीत घेतले होते. ई निविदांचा निर्णय एप्रिलमध्ये घेण्यात आला. केंद्राचा निधी परत जावू नये यासाठीच तातडीने निर्णय घेण्यात आले. यात कोणताही गैरप्रकार झालेला नाही. स्वत: पंकजा मुंडे कोणत्याही चौकशीस तयार आहेत. याप्रकरणी फारतर चिक्की व अन्य उत्पादनांच्या गुणवत्तेची चौकशी करू.
दरम्यान, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केंद्र सरकारकडे राज्यातील प्रलंबित जलसिंचन प्रकल्पांसाठी ३०७ कोटी रूपयांची मागणी केली. राज्यातील १९ सिंचन प्रकल्पांना मंजुरी देण्याची मागणी राज्याने केंद्राकडे कली होती. त्यापैकी सहा प्रकल्पानां केंद्राने हिरवा कंदील दाखविला आहे. त्यासाठी ३१६ पैकी केवळ साडेनऊ कोटी रूपये केंद्राने दिले. उर्वरित ३०७ कोटी रूपये तातडीने देण्याची विनंती महाजन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे. याखेरीज राज्यातील उर्वरित १३ प्रकल्पांना मंजुरी देण्याची विनंती राज्य सरकारने केंद्रीय पर्यावरण खात्यास केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा