आंतरराष्ट्रीय स्तरावरील वैज्ञानिक संशोधनात भारताचे योगदान दयनीय असल्याबद्दल चिंता व्यक्त करून सध्याच्या उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी सामूहिकरीत्या प्रयत्न करावेत, असे आवाहन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी गुरुवारी येथे केले.
‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (एनआयटी) या संस्थेच्या संचालकांच्या परिषदेत पंतप्रधान बोलत होते. आपल्या देशातील विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात अनेक आव्हाने आपल्यासमोर आहेत. २०१० मध्ये जागतिक स्तरावरील वैज्ञानिक प्रकाशनांमध्ये भारताचे संशोधनातील योगदान केवळ साडेतीन टक्के होते. तर चीनचा हाच वाटा २००७ मध्ये २१ टक्के होता, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. जागतिक स्तरावरील संशोधनाच्या क्षेत्रात भारताचा वाटा केवळ २.२ टक्के होता. या तुलनेत चीन व अमेरिकेचे योगदान अनुक्रमे ९.२ टक्के व ३२.४ टक्के होते. ही परिस्थिती सुधारावी म्हणून ‘एनआयटी’ च्या संचालकांनी सामूहिकरीत्या अथक प्रयत्न करण्याची गरज आहे, असे आवाहन मनमोहन सिंग यांनी केले.

Story img Loader