केंद्रातील सरकार चालविण्यासाठी पंतप्रधान आणि काँग्रेसचे अध्यक्ष अशी दोन सत्ताकेंद्रांची व्यवस्था आदर्श आहे आणि यापुढेही हीच व्यवस्था कायम राहावी, असे वक्तव्य काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते जनार्दन द्विवेदी यांनी येथे मंगळवारी केले.
काँग्रेस अध्यक्ष आणि पंतप्रधानांचे पद वेगवेगळे असण्याची व्यवस्था प्रभावी ठरली नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी अलीकडेच दिली होती. दिग्विजय यांचे विधान खोडून काढताना द्विवेदी यांनी सोनिया गांधी व मनमोहन सिंग यांच्यातील समन्वय, विश्वासाच्या संबंधांची वारेमाप प्रशंसा केली. दिग्विजय सिंह व द्विवेदी यांच्यात नेहमीच छत्तीसचा आकडा राहिला आहे. शिवाय काँग्रेसश्रेष्ठींची संमती वा इशाऱ्याशिवाय द्विवेदी सहसा कोणतेही विधान करीत नाहीत. त्यामुळे त्यांनी विधान विशिष्ट उद्देशानेच केल्याचे मानले जात आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार मनमोहन सिंग हेच असतील काय, या तर्काला या वक्तव्यामुळे चालना मिळाली आहे. मनमोहन सिंग पंतप्रधानपदाचे उमेदवार नसतील तर सोनिया गांधी यांच्यासोबत केंद्रात दुसरे सत्ताकेंद्र कोण असू शकेल, या विषयीही तर्क लढविले जात आहेत. द्विवेदी यांच्या या विधानामुळे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीपुढेही प्रश्नचिन्ह लागले आहे.  ‘ सोनिया गांधी व पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यात उत्तम समन्वय व चांगले संबंध आहेत. असे वैशिष्टय़पूर्ण नाते कुठेही बघण्यात आले नाही आणि अन्यत्र दिसतही नाही. भविष्यातही हे नाते व हीच व्यवस्था आदर्श ठरावी,’ असेही ते म्हणाले.

Story img Loader