देशातल्या एका महानगराचं महापौरपद पहिल्यांदाच एक दलित व्यक्ती सांभाळणार आहे. विशेष म्हणजे महापौरपदी विराजमानी होणारी ही २८ वर्षीय तरुणी आहे. या तरुणीचं नाव आर प्रिया आहे. एवढचं नव्हे तर प्रिया चेन्नई महापालिकेची आतापर्यंतची सर्वांत तरुण महापौर ठरली आहे. द्रमुक पक्षाने गुरुवारी ३ मार्चला २८ वर्षीय प्रियाचं चेन्नई कॉर्पोरेशनच्या महापौरपदासाठी नाव दिलंय. चेन्नईत पालिकेत डीएमकेला बहुमत मिळालं असून लवकरच प्रियाची महापौरपदी औपचारिक निवड होणार आहे. तर, पेरुंगुडी झोनमधून प्रभाग १६९ मधून नगरसेवक म्हणून निवडून आलेले महेश कुमार यांना पक्षाने उपमहापौरपदासाठी उमेदवारी दिली आहे.
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, प्रिया चेन्नईचं महापौरपद भूषवणारी पहिली दलित आणि सर्वात तरुण महिला ठरणार आहे. तारा चेरियन आणि कामाक्षी जयरामन यांच्यानंतर चेन्नईच्या इतिहासात हे पद भूषवणारी ती तिसरी महिला आहे. उत्तर चेन्नईतील थिरू वी का नगर येथील आर प्रिया, वॉर्ड क्रमांक ७३ मधून शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक जिंकली. दरम्यान, द्रमुक पक्षाने ग्रेटर चेन्नई कॉर्पोरेशनसह सर्व २१ महानगरपालिकांमध्ये बहुमत मिळवले आहे. त्यांनी राज्यभरात१३८ नगरपालिका आणि ४९० नगर पंचायती जिंकल्या आहेत.
द्रमुक पक्षाने महानगरपालिकेत ९५२ प्रभाग, नगरपालिकांमध्ये २,३६० आणि नगर पंचायतींमध्ये ४,३८९ प्रभाग जिंकले आहे.