नोबेल पारितोषिक विजेते लेखक व्ही.एस.नायपॉल यांच्यावरील टीकेनंतर आता ज्येष्ठ नाटय़कर्मी व अभिनेते गिरीश कर्नाड यांनी आता नोबेल विजेते भारतीय साहित्यिक रवींद्रनाथ टागोर हे दुय्यम दर्जाचे नाटककार होते, असे वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे. कर्नाड यांच्या वक्तव्यावर बंगाली चित्रपट व नाटय़ क्षेत्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
फाळके पुरस्कार विजेते अभिनेते सौमित्र चटर्जी यांनी कर्नाड यांचे विधान गोंधळात टाकणारे आहे असे म्हटले आहे. नोबेल विजेत्या लेखकास दुय्यम दर्जाचे संबोधणे योग्य नाही. देशातील नाटय़ वाङ्मयातील सुरुवातीच्या काळातील टागोरांच्या योगदानाचे कर्नाड यांनी अवमूल्यन केले आहे. वास्तवतेकडे बघण्याची टागोरांची एक वेगळी दृष्टी होती. टागोरांनी गरिबांसाठी लिहिले नाही असे कर्नाड यांनी म्हटले आहे तेही मूर्खपणाचे आहे, असे चटर्जी म्हणाले. टागोरांची नाटके दिग्दíशत करणारे देवाशिष रॉय-चौधरी यांनी सांगितले की, कर्नाड हे बंगाली नाहीत. त्यामुळे त्यांना टागोरांची सगळी नाटके उपलब्ध झाली नसावीत. टागोरांची नाटके जगप्रसिद्ध आहेत. ते काळाच्या फार पुढे होते.
नीलमंगला येथे वार्ताहरांशी बोलताना कर्नाड म्हणाले की, टागोर हे थोर कवी होते, पण नाटककार म्हणून त्यांची कामगिरी दुय्यम दर्जाची होती. त्यांनी अनेक नाटके लिहिली, पण त्यांच्या समकालीनांनी ती कधीच रंगभूमीवर आणली नाहीत. समकालीन बंगाली रंगभूमीने त्यांना कधीच स्वीकारले नव्हते. त्यांनी त्यांची एकदोन नाटके केली असतील, पण त्यातही त्यांची विनोदावर आधारित नाटके यशस्वी झाली, इतर नाटके अपयशी ठरली.
ज्ञानपीठ विजेते लेखक व नाटककार गिरीश कर्नाड यांना त्यांच्या या मताबाबतचे कारण विचारले असता ते म्हणाले की, टागोरांची नाटके दुय्यम दर्जाची होती, मग त्याला दुसरे काय म्हणणार. गेल्या ५० वर्षांत भारताने बादल सरकार, मोहन राकेश, विजय तेंडुलकर यांच्यासारखे अनेक चांगले नाटककार दिले, जे टागोरांपेक्षा सरस होते.
ययाति, तुघलक, नागमंडल, ब्रोकन इमेजेस यांसारखी नाटके निर्माण करणारे गिरीश कर्नाड यांनी असेही सांगितले की, टागोरांना गरिबांच्या व्यक्तिरेखा समजल्याच नाहीत. कारण ते श्रीमंत खानदानातून आलेले होते. त्यांच्या नाटकातील गरिबांचे प्रतिनिधित्व करणारी पात्रे ही जिवंत स्वरूपात सामोरी येत नाहीत. ती ‘कार्डबोर्ड’ स्वरूपातील पात्रे आहेत. त्यांच्या नाटकांचा कुठलाही प्रभाव नव्हता. बंगाली नाटककार गिरीश घोष व इतर नाटककार त्यांच्या नाटकांनी प्रभावित झाले नव्हते. एखाद्याला नोबेल मिळाले की, ती व्यक्ती फार वेगळी आहे, असे समजण्याची लोकांची प्रवृत्ती आहे.
गेल्या आठवडय़ात मुंबईतील साहित्य मेळाव्यात कर्नाड यांनी नोबेल विजेते लेखक नायपॉल यांच्यावर टीका करताना असे म्हटले होते की, नायपॉल यांची भारतीय मुस्लिमांविषयीची मते योग्य नाहीत. भारताच्या अनुषंगाने विचार करायचा तर ते फार विश्वासार्ह लेखक नाहीत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा