पीटीआय, पाटणा

बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यादव आणि राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) आमदार तेजप्रताप यादव मंगळवारी सक्तवसुली संचालनालयासमोर (‘ईडी’) हजर राहिले. नोकऱ्यांसाठी जमीन घोटाळा प्रकरणी या दोघांना ‘ईडी’ने बोलावले होते. माजी मुख्यमंत्री आणि माजी रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनाही बुधवारी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.

राबडीदेवी या पाटण्यातील बँक मार्ग भागातील ‘ईडी’च्या कार्यालयात पोहोचल्या तेव्हा त्यांच्याबरोबर सर्वात मोठी मुलगी आणि पाटलीपुत्रच्या खासदार मिसा भारती या होत्या. यावेळी राजदचे शेकडो कार्यकर्त्यांनी ‘ईडी’च्या कार्यालयाबाहेर जमून घोषणाबाजी केली. नोकऱ्यांसाठी जमीन घोटाळा प्रकरणात अतिरिक्त तथ्ये समोर आल्याने त्यांची खातरजमा करण्यासाठी पुन्हा एकदा चौकशी करण्यात येत असल्याचे ‘ईडी’च्या सूत्रांकडून सूचित करण्यात आले. राबडीदेवी यादव, तेजप्रताप यादव आणि लालूप्रसाद यादव यांची उत्तरे आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत नोंदवली जातील.

दरम्यान, विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्रातील भाजप सरकार विरोधकांना त्रास देण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर कर असल्याचा आरोप राजदचे प्रवक्ते एजाझ अहमद यांनी केला.

Story img Loader