राफेल, सवर्णांना आरक्षण विधेयक आणि नागरिकत्व दुरूस्ती विधेयकावर सभागृहात गंभीर चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. राजस्थानमधील जयपूर येथे एका सभेदरम्यान राफेलवरून मोदींवर टीका केली आहे. ५६ इंचाची छाती असणारे पंतप्रधान लोकसभेत एक मिनिटही येऊ शकले नाहीत. इतकेच काय त्यांनी संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांना सभागृहात आपल्या संरक्षणासाठी पाठवले. अशा पद्धतीने जनतेच्या न्यायालयातून चौकीदाराने पळ काढल्याचा आरोप त्यांनी केला.
Rahul Gandhi in Jaipur: CBI Director Alok Verma was removed at midnight. Now Supreme Court said he will be reinstated. We want an inquiry in #Rafaledeal, we want a JPC also. 56 inch ki chhati wale PM Lok Sabha mein 1 minute ke liye bhi nahi aa paye. pic.twitter.com/U65qiVzjPJ
— ANI (@ANI) January 9, 2019
नवीन सरकार सत्तेवर आल्यानंतर राजस्थानमध्ये बोलताना राहुल गांधी उत्साहात दिसले. त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून आपल्या पक्षाचे कौतुक करताना मोदी सरकारवर टीका करण्याची संधी सोडली नाही. देशातील शेतकरी आणि युवकांनी ‘बॅकफुट’वर येऊन बॅटिंग करू नये. उलट त्यांनी ‘फ्रंटफुट’वर येऊन षटकार मारावा असा सल्ला दिला.
रात्री अंधारात सीबीआयच्या संचालकांना हटवले. केंद्र सरकारला झटका देत सर्वोच्च न्यायालयाने त्यांना पुन्हा पदावर बसवले. राफेल प्रकरणी जेपीसीची चौकशी झाली पाहिजे. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे छोटे दुकानदार नष्ट झाले. बँकेचा सारा पैसा अनिल अंबानी आणि त्यांच्या मित्रांना दिला. युवक, शेतकरी आणि छोट्या दुकानदारांना किती पैसे दिले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.