राफेल विमान खरेदी प्रकरणी काँग्रेसने भाजपला घेरलेले असताना सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेपास नकार दिल्यानंतर भाजपला बळ मिळाले आहे. काँग्रेसला प्रत्युत्तर देण्यासाठी राफेल प्रकरणी म्हणणं मांडण्यासाठी भाजप देशभरात ७० पत्रकार परिषदा घेणार आहे.

राफेल विमान खरेदी प्रकरणात काँग्रेसने कोंडी केलेल्या भाजपला सर्वोच्च न्यायालयात मोठा दिलासा मिळाला आहे. त्यानंतर काँग्रेसविरोधात भाजपनेही काँग्रेसविरोधात आक्रमक धोरण स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. राफेलवरून काँग्रेसकडून होत असलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजप सोमवारी देशभरात एकाचवेळी ७० पत्रकार परिषदा घेणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने राफेल प्रकरणात हस्तक्षेपास नकार दिला आहे. काँग्रेसने केंद्र सरकारविरुद्ध जे कटकारस्थान रचलं आहे, ते उघड करण्यासाठी या पत्रकार परिषदा घेत असल्याचं भाजपचे मीडियाप्रमुख आणि राज्यसभा सदस्य अनिल अनिल बलूनी यांनी स्पष्ट केलं आहे.

भाजप शासित राज्यातील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, देवेंद्र फडणवीस, विजय रुपाणी, सर्वानंद सोनोवाल हे गुवाहाटी, अहमदाबाद, जयपूर आणि अगरातला येथे पत्रकार परिषदा घेतील. तसेच केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन, रवि शंकर प्रसाद, प्रकाश जवाडेकर, जे. पी. नड्डा, स्मृती इराणी, सुरेश प्रभू, माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते माध्यमांना याविषयी माहिती देणार आहेत.