Rafale Deal: राफेल करारात गैरव्यवहार झालेला नाही, हे आम्ही आधीपासूनच सांगत होतो. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे यावर शिक्कामोर्तब झाले असून काँग्रेसने राजकीय स्वार्थापायी या करारावरुन सरकारवर निराधार आरोप केले, अशी टीका गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केली आहे. तर संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी देखील ‘अखेर सत्याचा विजय झाला’, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

फ्रान्सकडून ३६ राफेल जेट विमाने खरेदी करण्याच्या करारात कोणताही गैरव्यवहार आढळलेला नाही, असे स्पष्ट करत सुप्रीम कोर्टाने मोदी सरकारला दिलासा दिला आहे. या करारातील ऑफसेट हक्क रिलायन्स डिफेन्सला देण्याच्या निर्णयातही आक्षेपार्ह काहीच सापडले नसल्याचे कोर्टाने स्पष्ट केले. या निर्णयामुळे राफेल करारासंदर्भातील आरोपांमधील हवाच निघून गेली असून आता भाजपाने यावरुन काँग्रेसवर टीकेची झोड उठवली आहे.

काँग्रेसने जनतेची दिशाभूल करुन राफेल करारावरुन राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला. धूळफेक करुन राजकारणात नेहमीच फायदा मिळवता येत नाही, असा टोला राजनाथ सिंह यांनी काँग्रेसला लगावला. राफेल करारात कोणताही घोटाळा झालेला नाही हे आम्हाला माहित होते, असेही त्यांनी सांगितले.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आता कराराच्या चौकशीसाठी नवीन समिती स्थापन करण्याच्या मागणीत अर्थ उरलेला नाही, असे त्यांनी काँग्रेसला सुनावले आहे. संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी हा करार नियमाला अनुसरुनच करण्यात आला होता. सर्व निकषांचे पालन करण्यात आले होते आणि शेवटी सत्याचाच विजय झाला, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

 

Story img Loader