काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल डील प्रकरणावरुन पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. पर्रिकरांचा यात काहीच सहभाग नव्हता असे त्यांनीच आपल्याला सांगितल्याचे राहुल यांनी म्हटले आहे. तसेच अनिल अंबानींना फायदा मिळवून देण्यासाठी त्यांनी हा संपूर्ण खेळ रचल्याचेही त्यांनी सांगितल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.


राहुल गांधी सध्या गोव्यामध्ये सुटीचा आनंद घेत आहेत. मंगळवारी त्यांनी गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांची भेट घेण्यासाठी विधानभवनातील त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली होती. त्यावेळी पुढील कार्यक्रमांसाठी उशीर होत असल्याचे सांगत पत्रकारांशी बोलण्याचे टाळले होते. मात्र, त्यानंतर त्यांनी केरळच्या कोच्चीमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना मोदींवर पुन्हा एकदा टीका केली.

पन्नास हजार कार्यकर्त्यांना संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले होते, मित्रांनो गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी मला सांगितले की, नव्या राफेल डीलशी माझा काहीही संबंध नाही. नरेंद्र मोदींनी अनिल अंबानीला फायदा मिळवून देण्यासाठी हा सर्व खेळ केला.

दरम्यान, राहुल गांधी यांच्या या माहितीवर गोव्याचे मंत्री मोविन गोडिन्हो यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, जेव्हा तुम्ही एखाद्याच्या प्रकृतीची चौकशी करायला येता तेव्हा ते तेवढ्यापुरतेच मर्यादित असायला हवे. यावरुन राजकारण करता कामा नये, जेव्हा मोठे नेते असे प्रकार करायला लागतात तेव्हा ते चुकीचे असते.

Story img Loader