राफेल करार करण्यामध्ये मनोहर पर्रिकरांचा काहीही संबंध नव्हता, किंबहुना त्यांना या कराराची माहितीदेखील नव्हती असा दावा राहुल गांधींनी केला होता. या वृत्ताचा दाखला देत गोव्याचे मुख्यमंत्री व माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. “आपण फक्त ५ मिनिटे भेटलो, त्या भेटीचा वापरही तुम्ही क्षुल्लक राजकारणासाठी करत आहात, या पाच मिनिटांच्या भेटीत एकदाही राफेल करारावर चर्चा झाली नाही,” असे स्पष्टीकरण पर्रिकर यांनी दिले आहे.

मंगळवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची विधिमंडळाच्या संकुलात भेट घेतली होती. पर्रिकर यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस करण्यासाठी ही भेट घेतल्याचे सांगितले जात होते. मात्र, कोच्चीतील सभेत राहुल गांधी यांनी पर्रिकर यांच्यासंदर्भात वरील विधान केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. मित्रांनो गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी मला सांगितले की, नव्या राफेल डीलशी माझा काहीही संबंध नाही. नरेंद्र मोदींनी अनिल अंबानीला फायदा मिळवून देण्यासाठी हा सर्व खेळ केला, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते.

राहुल गांधी यांच्या या विधानावर पर्रिकर यांनी त्यांनाच पत्र लिहून प्रत्युत्तर दिले आहे. पर्रिकर म्हणतात, तुम्ही मंगळवारी कोणतीही पूर्वसूचना न देता माझी भेट घेण्यासाठी आलात. माझ्या प्रकृतीची विचारपूस केली. भारतीय राजकारणामध्ये पक्षातील भेद बाजुला ठेवत प्रतिस्पर्ध्यांना चांगलं आरोग्य चिंतण्याची परंपरा आहे. तुमच्या या कृतीचे मी स्वागत करतो. पण प्रसारमाध्यमांमध्ये आलेली तुमची वक्तव्ये बघून मला धक्काच बसला. या वृत्तांनुसार तुम्ही माझा दाखला देत काही विधाने केलीत. मला राफेल कराराविषयी माहिती नव्हती, असे पर्रिकरांनी सांगितल्याचे तुम्ही म्हणालात. पण आपली भेट फक्त पाच मिनिटे झाली, या भेटीत आपल्यात राफेल करारावर चर्चा देखील झाली नाही, असे पर्रिकरांनी सांगितले.

देशाच्या सुरक्षेचा विचार करुनच व सगळ्या प्रक्रिया पार पाडूनच राफेल विमानांचा करार करण्यात आला, हे मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो असे पर्रिकर म्हणाले आहेत. आधी प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी भेट घ्यायची आणि मग राजकीय फायद्यासाठी खोटे दावे केल्याने तुमच्या या भेटीबद्दल मनात शंका निर्माण झाली, असे उद्विग्न झालेल्या पर्रिकरांनी राहुल गांधी यांना सुनावले आहे. “मी इथं प्राणघातक रोगाशी सामना देत असूनही प्रतिकूल परिस्थितीत गोव्याच्या हितासाठी काम करतोय. मलाही असंच वाटलं की गोव्याच्या हितासाठी मी काम करत रहावं, माझी प्रकृती सुधारावी अशी तुमची इच्छा होती. परंतु तुमच्या मनात वेगळंच काही आहे याची मला शंकादेथील आली नाही. अत्यंत निराश झाल्यामुळे मी तुम्हाला पत्र लिहून सत्य काय आहे ते लोकांना सांगावं,” असं सांगतानाच आजारी व्यक्तिच्या भेटीचा उपयोग राजकीय संधी साधण्यासाठी करू नका असा सल्ला पर्रिकरांनी राहुल यांना दिला आहे.

Story img Loader