राफेल विमान व्यवहारावरून भाजपाने पुन्हा एकदा राहुल गांधींवर पलटवार केला आहे. राफेलप्रकरणी सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वद्रा कारागृहात जातील असा इशारा, भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी दिला आहे. याप्रकरणी त्यांनी पुरावा म्हणून रॉबर्ट वद्रा यांचे लंडन येथील १९ कोटींच्या घराचे छायाचित्र आणि वद्रा यांचे ज्यूरिचला गेल्याचे विमानाचे तिकीट सादर केले.

देशातील भ्रष्टाचाराच्या प्रत्येक प्रकरणात काँग्रेसचा सहभाग आहे. काँग्रेसला कमिशन न मिळाल्यामुळे आणि राहुल यांच्या लाँचिंगसाठी राफेलवर वाद केला जात असल्याचा गंभीर आरोप पात्रा यांनी केला.

वद्रा यांनी आपले मित्र संजय भंडारी यांच्याबरोबर एक ऑफसेट कंपनी सुरु केली होती. परंतु, संजय भंडारी आणि दसॉल्ट यांच्यात न जमल्यामुळे राफेल व्यवहार यूपीएच्या काळात होऊ शकला नाही. मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर संजय भंडारींवर कारवाई होत आहे. आता रॉबर्ट वद्रा यांच्याभोवती फास आवळला जात आहे. ते वाचणार नाहीत. ते एकदिवस निश्चितपणे कारागृहात जातील. हा काही राजकीय बदला घेण्याचा प्रकार नाही. यावेळी पात्रा यांनी लालूप्रसाद यादव यांचे उदाहरण दिले. लालूंनी चारा घोटाळा केला. भले त्यासाठी २० वर्षे लागली. पण आज ते कारागृहात आहेत.

संजय भंडारीने २००८ मध्ये एक लाखांच्या भांडवलाच्या माध्यमातून ऑफसेट कंपनी बनवली होती. जी नंतर हजारो कोटींची कंपनी झाली. मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर २०१४ मध्ये दलाली करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई सुरू झाली. २०१६ मध्ये भंडारीच्या घरावर, कार्यालयावर छापे पडले. छाप्यात संरक्षण मंत्रालयातील दस्तावेज, संरक्षण व्यवहाराचे गोपनीय कागदपत्रे घरी मिळाले.

राफेलची कागदपत्रेही भंडारीच्या घरी मिळाली. अनेक इ-मेल्स आढळून आली. लंडनमध्ये भंडारीचे नातेवाईक सुमीत चड्ढाद्वारे वद्रा यांच्यासाठी १९ कोटींचे घर खरेदी केल्याची माहिती आहे. २००९ मध्ये हे घर खरेदी केल्याचे पात्रा यांनी सांगितले.

Story img Loader