Kerala Ragging Case: केरळमधील एका सरकारी महाविद्यालयातून रॅगिंगचा एक भयानक आणि तितकाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तृतीय वर्षाच्या नर्सिंगच्या पाच विद्यार्थ्यांनी काही ज्युनियर विद्यार्थ्यांचा अत्यंत क्रूर पद्धतीने मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप आहे. आरोपी विद्यार्थ्यी प्रथम वर्षाच्या काही विद्यार्थ्यांना नग्न करायचे आणि त्यांना कंपास बॉक्समधील वस्तूंनी मारहाण करायचे. या पीडित विद्यांर्थ्यांना जवळजवळ तीन महिने क्रूरपणे मारहाण करण्यात आली. इतकेच नव्हे तर आरोपी विद्यार्थ्यांनी पीडित विद्यार्थ्यांच्या गुप्तांगाला डंबेल्स देखील बांधले होते. हे प्रकरण समोर आल्यानंतर पाच आरोपी विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान ही क्रूर घटना कोट्टायम येथील सरकारी नर्सिंग महाविद्यालयामध्ये घडली आहे. या प्रकरणातील प्रथम वर्षाच्या तीन पीडित विद्यार्थ्यांनी कोट्टायम गांधीनगर पोलिसांकडे औपचारिक तक्रार दाखल केली होती. हे तिन्ही विद्यार्थी तिरुवनंतपुरम येथील आहे. त्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनंतर त्यांच्याबरोबर, नोव्हेंबर २०२४ पासून सुरू असलेल्या हिंसक कृत्यांचा खुलासा झाला. या तक्रारीनंतर आरोपी विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले असून, रॅगिंग विरोधी कायद्यांतर्गत त्यांना अटक करण्यात आली आहे.
पीडित विद्यार्थ्यांचा क्रूर पद्धतीने छळ
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना आरोपी विद्यार्थी नग्न उभे करायचे, त्यांच्या गुप्तांगातून डंबेल लटकवायचे आणि कंपास बॉक्समधील धारदार वस्तूंनी त्यांना दुखापत करायचे. त्याची क्रूरता इथेच थांबली नाही. अरोपी पीडित विद्यार्थ्यांच्या जखमांवर लोशन लावायचे, ज्यामुळे त्यांना आणखी वेदना व्हायच्या. जेव्हा पीडित वेदनेने ओरडायचे तेव्हा आरोपी त्यांच्या तोंडात जबरदस्तीने लोशन ओतायचे. आरोपींनी या सर्व प्रकाराचे चित्रीकरण केले होते. कोणी या प्रकरणी तक्रार केली तर त्यांचे करिअर संपवण्याची धमकी आरोपी पीडितांना द्यायचे.
पाचही आरोपी विद्यार्थी सध्या पोलीस कोठडीत
तक्रारीत असाही दावा करण्यात आला आहे की, रविवारी दारू खरेदी करण्यासाठी आरोपी विद्यार्थी पीडितांकडून पैसे गोळा करत होते. तेव्हा काही विद्यार्थ्यांनी पैसे देण्यास नकार दिल्यामुळे त्यांना मारहाण करण्यात आली. यातील एका विद्यार्थ्याने, जो आता छळ सहन करू शकला नाही, त्याच्या वडिलांना हा सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी त्याला पोलिसांशी संपर्क साधण्यास प्रोत्साहित केले. दरम्यान आता पाचही आरोपी विद्यार्थी सध्या पोलीस कोठडीत आहेत.