समाजमाध्यमापासून ते जाहीर कार्यक्रमांपर्यंत आणि चित्रपटांपासून ते वेबसिरीजपर्यंत सर्व ठिकाणी पहिलं प्रेम या विषयावर अनंत चर्चा आणि मनोरंजनाचं साहित्य उपलब्ध आहे. त्यामुळे हातातल्या मोबाईलपासून टीव्ही आणि चित्रपटगृहातल्या मोठ्या पडद्यावर देखील ‘पहिलं प्रेम’ या विषयीचे चित्रपट किंवा इतर साहित्य पाहण्याची आपल्या सर्वांनाच सवय झाली आहे. मात्र, देशाच्या संसदेत, संसदेच्या वरीष्ठ सभागृहात पहिल्या प्रेमावर चर्चा झाल्याचं जर कुणी सांगितलं, तर पहिल्या प्रथम त्यावर विश्वास बसणं कठीण होऊन जाईल! पण हे सत्य आहे. कारण ज्या संसदेत देशाचा विकास, वर्तमान आणि भविष्य यासंदर्भातल्या अनेक गहन विषयांवर चर्चा होते, त्याच राज्यसभेत वातावरण हलकं फुलकं होण्यासाठी ही नेतेमंडळी अशा प्रकारच्या मिश्किल विषयांनाही हात घालतात! असाच काहीसा प्रकार सोमवारी देशाच्या संसदेत घडला!
नेमकं झालं काय?
देशाचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे पदसिद्ध सभापती व्यंकय्या नायडू हे लवकरच निवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यांच्या निरोपाच्या प्रस्तावावर संसदेच्या वरीष्ठ सभागृहात अर्थात राज्यसभेत वेगवेगळ्या पक्षांच्या सदस्यांची भाषणं सुरू असताना सोमवारी आम आदमी पक्षाचे पंजाबमधील तरुण राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांनी आपल्या भाषणामध्ये अशी काही टिप्पणी केली, की आख्ख्या सभागृहात त्यावर हशा पिकला!
काय म्हणाले राघव चढ्ढा?
व्यंकय्या नायडूंच्या निरोपाच्या भाषणामध्ये राघव चढ्ढा यांनी आपल्या आयुष्यात सर्व पहिल्या गोष्टींना विशेष स्थान असतं असं म्हटलं. “सगळ्यांना आपला पहिला अनुभव लक्षात राहतो. शाळेतला पहिला दिवस, पहिले प्राध्यापक, पहिल्या शिक्षिका, पहिलं प्रेम…या सभागृहात जेव्हा मी आलो, खासदार म्हणून मी माझी वाटचाल जेव्हा सुरू केली, तेव्हा माझे पहिले सभापती म्हणून मी तुम्हाला कायम लक्षात ठेवेन”, असं राघव चढ्ढा म्हणाले.
त्यांच्या या विधानावर सभागृहात हशा पिकला असतानाच सभापती व्यंकय्या नायडू यांनी देखील त्यात सहभागी होत मिश्किल टिप्पणी करताच हशा अजूनच वाढला. “राघव, माझ्यामते प्रेम एकच असतं ना? एकदा, दोनदा, तीनदा असं काही नसतं ना? प्रेम पहिलंच असतं ना?” असा उपहासात्मक प्रश्न नायडू यांनी केला.
यावर बोलताना राघव चढ्ढा यांनी “मी इतका अनुभवी नाही सर… अजून आयुष्यात एवढा अनुभव आलेला नाही. पण जेवढं काही लोकांनी समजावलंय, त्यानुसार चांगलं असतं पहिलं प्रेम”, असं उत्तर दिलं.
त्यावर या चर्चेची शेवटची टिप्पणी करताना सभापती व्यंकय्या नायडू यांनी “पहिलं प्रेम चांगलं असतं.. तेच कायम असायला हवं.. आयुष्यभर”, असं म्हणत या चर्चेला पूर्णविराम दिला!