येत्या सप्टेंबरमध्ये रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांचा कार्यकाळ संपतो आहे. त्यामुळे मंगळवारी सादर करण्यात आलेल्या पतधोरण आढाव्यावेळी साहजिकच त्यांची गव्हर्नरपदी फेरनियुक्ती होणार का, असा प्रश्न पत्रकारांच्या मनात होता आणि तो रघुराम राजन यांना विचारण्यातही आला. राजन यांनीही मग आपल्या शैलीमध्ये त्याला उत्तर दिले.
जर कोणती बातमी असेल, तर ती तुम्हाला कळतेच. त्यामुळे तुमच्या त्या आनंदावर विरजण घालण्याची माझी अजिबात इच्छा नाही, असे रघुराम राजन यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर रिझर्व्ह बॅंक आणि केंद्र सरकार स्वतंत्रपणे कोणतेही निर्णय घेत नसून, परस्परांशी चर्चा करून एकत्रितपणेच निर्णय घेत असल्याचे राजन यांनी स्पष्ट केले.
रघुराम राजन यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ येत्या सप्टेंबरमध्ये संपुष्टात येतो आहे. भाजपचे राज्यसभेतील सदस्य सुब्रमण्यम स्वामी यांनी राजन यांच्या निर्णयांवर टीका करताना त्यांना पदावरून दूर करण्याची मागणी केली होती. राजन यांच्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान झाल्याचा आरोप स्वामी यांनी केला होता. यामुळे रघुराम राजन यांची फेरनियुक्ती होणार की त्यांचा कार्यकाळ संपल्यावर दुसऱ्या व्यक्तीची गव्हर्नरपदी नियुक्ती केली जाणार, याबद्दल विविध चर्चा सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा प्रशासकीय निर्णय असून, तो सप्टेंबरमध्ये घेतला जाईल, असे म्हटले आहे.

Story img Loader