रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांचे मत
बाजारपेठेवर आधारित अर्थव्यवस्थेत काहीही खरेदी करण्यासाठी पैशाचीच गरज भासते. पैसा अधिक चांगल्या प्रकारे सामाजिक समानता आणू शकतो. त्यामुळे पैशाबाबत असलेली नकारात्मक भावना सोडून त्याचा सकारात्मक वापर वाढवला पाहिजे. समाजात पैशाची स्वीकारार्हता वाढवली पाहिजे, असे मत रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी शनिवारी व्यक्त केले. येथील शिव नाडर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात शनिवारी ते बोलत होते.
बाजारपेठेवर आधारित व्यवस्थेत घराण्याची परंपरा, इतिहास, व्यक्तीचा मोठेपणा, वेशभूषा, बोलण्या-चालण्याची रीत या गोष्टी महत्त्वाच्या ठरत नाहीत, तर पैसाच नागरिकांना एका पातळीवर आणण्यास मोठी भूमिका बजावतो. त्यामुळे दलितांना सक्षम बनवण्यासाठी आरक्षणे देण्यापेक्षा त्यांना व्यवसाय सुरू करणे अधिक सुकर केले तर त्यातून अधिक चांगल्या प्रकारे समानता आणता येईल. त्यांचा सामाजिक स्तर उंचावता येईल, असे राजन म्हणाले.
नव्या व्यवस्थेत मानवी कौशल्ये आणि बुद्धिमत्ता यांना अधिक महत्त्व येणार आहे. ती विकसित करण्यासाठी उपयोगात येणारे चांगल्या प्रतीचे शिक्षण कायमच महाग होते आणि ते यापुढे अधिक महाग होत जाईल.
विद्यार्थ्यांनी फसव्या आणि बोगस शिक्षणसंस्थांच्या नादी लागून पैसे वाया घालवू नयेत. त्यातून रोजगारक्षम पदव्या तर मिळत नाहीतच, पण विद्यार्थ्यांनी घेतलेले शैक्षणिक कर्ज फेडणेही अवघड होते, असा इशाराही राजन यांनी दिला.
प्रगती समाधानकारक
देशाची आर्थिक प्रगती समाधानकारक आहे. मात्र आणखी चांगल्या कामगिरीला वाव आहे. जगात श्रीमंत आणि गरीब देशांतली तफावत वाढत आहे, असेही ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा