विजय केळकर, विनोद राय, अरुंधती भट्टाचार्य यांच्यासह डझनभर नावे चर्चेत
भारतीय रिझव्र्ह बॅंकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी मुदतवाढ स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर नव्या गव्हर्नरपदासाठी डझनभर नावे चर्चेत आहेत. त्यात डेप्युटी गव्हर्नर ऊर्जित पटेल, कॅगचे माजी प्रमुख विनोद राय आणि एसबीआयच्या प्रमुख अरुंधती भट्टाचार्य यांची नावे आघाडीवर आहेत.
राजन यांनी मुदतवाढ स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नव्या गव्हर्नरची लवकरच निवड करण्यात येणार असल्याची घोषणा केल्यानंतर नवे गव्हर्नर कोण असतील, याची जोरदार चर्चा सुरू आहे. एसबीआय प्रमुख अरुंधती भट्टाचार्य यांचा पदाचा कार्यकाल सप्टेंबरमध्ये संपत आहे. कॅगचे माजी प्रमुख विनोद राय यांचेही नाव आघाडीवर आहे.
मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रह्मण्यम, जागतिक बॅंकेचे प्रमुख अर्थतज्ज्ञ कौशिक बसू, महसूल सचिव शक्तिकांत दास, के. व्ही. कामत, सेबीचे अध्यक्ष यू. के. सिन्हा, डेप्युटी गव्हर्नर राकेश मोहन, सुबीर गोकर्ण, अशोक लाहिरी, माजी अर्थ सचिव विजय केळकर, सीसीआयचे माजी अध्यक्ष अशोक चावला, अशोक लाहिरी आणि प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ आर. वैद्यनाथन यांचीही नावे गव्हर्नरपदासाठी चर्चेत आहेत. मात्र, कोणाची नियुक्ती होणार याबाबत उत्सुकता आहे.