उत्तर भारतात पावसाने थैमान घातले असून अतिवृष्टीमुळे मंगळवारी ११ जणांना जीव गमवावा लागला. त्यामुळे पावसाच्या बळींची संख्या १३१ झाली आहे. येथे विविध तीर्थक्षेत्री दर्शनासाठी गेलेले सुमारे ७२ हजार यात्रेकरू पावसामुळे अडकून पडले आहेत, तर हिमाचल प्रदेशात अडकलेल्या यात्रेकरुंचा आकडा १७०० वर पोहोचला आहे. बचावकार्य वेगाने सुरू असले तरीही पावसाच्या जोरामुळे बचाव पथकांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे.
अलकनंदा नदीचे रौद्ररूप
केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, यमुनोत्री आदी तीर्थक्षेत्री दर्शन घेण्यासाठी गेलेले ७२ हजार भाविक रुद्रप्रयाग, चामोली आणि उत्तरकाशी जिल्ह्य़ात अडकून पडले आहेत. महामार्ग बंद पडल्याने चारधाम यात्राही रद्द करण्यात आली आहे. चामोली येथे सर्वाधिक म्हणजे २७,०४०, रुद्रप्रयाग येथे २५ हजार आणि उत्तरकाशी जिल्ह्य़ात ९८५० भाविक अडकून पडले आहेत.
राज्यात मान्सूनचे ६३ बळी,
राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या जोरदार पावसामुळे तब्बल ६३ जणांचा बळी गेला असून तीन हजारहून अधिक घरांची पडझड झाली आहे. मात्र मान्सून सर्वत्र स्थिरावला असून अातापर्यंत ५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.
पावसामुळे धरणे भरू लागली असून दुष्काळाची तीव्रता कमी झाल्याने जनावरांच्या छावण्यात ३० टक्के घट झाली आहे. राज्यात गेल्या काही दिवसापासून कोसळत असलेल्या जोरदार पावसामुळे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.
महाडला पुराचा तडाखा
सावित्री आणि गांधारी नद्यांनी मंगळवारी धोक्याची पातळी ओलांडल्याने महाड शहरातील सखल भागात पुराचे पाणी शिरण्यास सुरुवात झाली. महाड शहाराला जोडणाऱ्या गांधारी पुलावर पाणी आले तर दस्तुरी नाका ते नाते खिंड परिसरातही पुराचे पाणी आल्याने संपर्क तुटला आहे.

Story img Loader