काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे एखाद्या निष्पाप मुलासारखे आहेत, बाबा रामदेवही तसेच म्हणतात. आपणही त्यांना ‘जे लिहून दिले ते वाचणारा निष्पाप मुलगा’ असे म्हणेन, अशी कडवट टीका समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी केली आहे. उत्तर प्रदेशातील बदाऊन येथे शुक्रवारी रात्री त्यांनी सांगितले की, जातीय दंगली पसरवल्याची टीका राहुल गांधी यांनी समाजवादी पक्षावर केली पण प्रत्यक्षात काँग्रेसनेच जातीय दंगलींची पायाभरणी केली आहे. राहुल गांधी हे लाकडाच्या गिरण्या, प्लायवूड कारखाने पाहून आल्याचे सांगतात पण त्याबाबत आपल्याला माहिती नाही. काँग्रेसने देशावर पन्नास वर्षे राज्य केले व अनेक दंगलीत काँग्रेसचाच हात होता. मुजफ्फरनगर येथील दंगलीत मारल्या गेलेल्या पाच जणांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी येथे आलेल्या आझम यांनी सांगितले की, मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या कामगिरीवर आपण समाधानी आहोत. ज्या दिवशी अखिलेश नीट काम करीत नाही असे दिसेल त्या वेळी मी पहिल्यांदा समाजवादी पक्षातून बाहेर पडेन. वादग्रस्त मंत्री व अपक्ष आमदार रघुराज प्रताप सिंग उर्फ राजा भैया यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेतल्यानंतर त्यांची भेट घेतल्याबाबत विचारले असता आझम खान यांनी सांगितले की, आपण मानवी संबंधांना महत्व देणाऱ्या आमदाराला भेटलो. राजा भय्या यांना उत्तर प्रदेश मंत्रिमंडळात घेऊन परत कॅबिनेट मंत्रीपद दिले आहे. प्रतापगडचे पोलिस उपअधीक्षक झिया उल हक यांची हत्या झाल्याच्या प्रकरणी राजाभैय्या यांना राजीनामा द्यावा लागला होता.
राजा भैय्या यांना मंत्रिमंडळात परत घेतल्याबाबत त्यांच्या पत्नीने जे आक्षेप घेतले आहेत त्यावर विचारले असता आझम म्हणाले की, आपल्या पतीच्या मृत्यूनंतर आपण २१ मागण्यांचा मसुदा सादर केला होता, तो स्वीकारण्यात आला होता. झिया उल हक यांच्या पत्नीच्या मागणीनुसार सीबीआय चौकशी करण्यात आली व त्यात राजा भैय्या यांना निर्दोष ठरवण्यात आले. त्यामुळे त्यांना परत मंत्रिमंडळात घेतले आहे. राजाभय्या यांना परत मंत्रिमंडळात घेण्याचा निर्णय हा मुख्यमंत्र्यांचा आहे; तो कुणाला खूश करण्यासाठी घेतलेला नाही.