विरोधी पक्षांनी वाटेल तसा प्रचार केला तरी प्रसारमाध्यमांपुढे काँग्रेसची बाजू मांडणारे प्रवक्ते व प्रतिनिधींनी चर्चेची पातळी घसरणार नाही, याची काळजी घेत कंबरेखाली वार न करता यूपीए सरकारची कामगिरी तसेच काँग्रेस पक्षाची धोरणे आणि भूमिका सभ्यतेने व संयमाने मांडावी, असे आवाहन आज काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केले.   
आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांशी शाब्दिक संघर्ष करताना काँग्रेस पक्षाला आपली बाजू शिस्तबद्ध पद्धतीने मांडता यावी म्हणून राजेंद्र प्रसाद रोडवरील जवाहर भवन येथे काँग्रेसचे प्रवक्ते, प्रसिद्धी विभागाचे सदस्य तसेच वृत्तवाहिन्यांवर पक्षाची भूमिका मांडणाऱ्या विविध स्तरांवरील सव्वादोनशे प्रतिनिधींच्या दोन दिवसांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षाची भूमिका समजावून दिल्यानंतर या प्रतिनिधींना विविध माध्यमांचा वापर करून सर्वसामान्य जनतेपर्यंत काँग्रेसचे म्हणणे पोहोचविण्याची जबाबदारी पार पाडावी लागेल.
सोमवारी या कार्यशाळेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या प्रवक्त्यांना चर्चा करताना सभ्य भाषेचा प्रयोग करण्याचा सल्ला दिला. आपला पक्ष महात्मा गांधींचा आहे, याची प्रवक्त्यांनी जाणीव ठेवावी, असे ते म्हणाले. वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या आणि सोशल मीडियावर असभ्य भाषेचा वापर करणाऱ्या प्रवक्त्यांची व प्रतिनिधींची गंभीर दखल घेतली जाईल आणि त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असाही इशारा राहुल गांधी यांनी दिल्याचे समजते.
काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची व प्रवक्त्यांची वैयक्तिक मते भिन्न असली तरी त्यांनी शक्यतोवर एकाच सुरात बोलावे, असे आवाहन त्यांनी केले. विरोधी पक्ष काँग्रेसच्या विरोधात निवडणुकीत वाटेल तसा प्रचार करतील, पण काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी सत्याची कास धरावी, पक्षाची भूमिका मांडताना मुरब्बी नेत्यांच्या अनुभवाचा लाभ घ्यावा, अशाही सूचना त्यांनी केली.
महाराष्ट्रातून या कार्यशाळेसाठी मुंबईच्या खासदार प्रिया दत्त, राज्यसभेचे खासदार भालचंद्र मुणगेकर, आमदार भाई जगताप, प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अनंत गाडगीळ, प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सत्यजीत तांबे, कृष्णा हेगडे यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

Story img Loader