नोटबंदी करतो, देशातला काळा पैसा बाहेर येईल. काळा पैसा संपला का? तर मुळीच नाही उलट वाढला आहे. मग सांगितलं की जीएसटी आणतो त्याने फायदा होईल कुणाचा फायदा झाला? असे प्रश्न विचारत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. छत्तीसगढमध्ये झालेल्या सभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम अदाणी यांचा उल्लेख करत जोरदार भाषण केलं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोपांच्या फैरी झाडल्या.
काय म्हणाले राहुल गांधी?
काही वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी म्हणाले होते की नोटबंदी केली की काळा पैसा बाहेर येईल आणि संपुष्टात येईल. काळा पैसा मिटला का? उलट वाढला. त्यांनी म्हटलं होतं GST आणतो, देशाची प्रगती होईल. जीएसटीचा कुणाला फायदा झाला का? उलट महागाई वाढली. काँग्रेसच्या कार्यकाळात ४०० रुपयांचा सिलिंडर मिळत होता आज किंमत किती झाली? १२०० रुपये. नरेंद्र मोदी म्हणाले होते १५ लाख रुपये प्रत्येकाच्या अकाऊंटमध्ये जमा होतील. शेतकऱ्यांसाठी जे कायदे आणले त्यामुळे शेतकरी आंदोलनाला बसले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी कायदे गौतम अदाणींसाठी आणत आहेत.
लोकांच्या जमिनी, पाणी सगळं अदाणींकडे वळवलं जातं
गौतम अदाणींना खाणी दिल्या जातात, जंगलं दिली जातात. पाणी, जमीन सगळं तुमच्याकडून हिरावून अदाणींना दिलं जातं आहे. भाजपाचे लोक आले की ते फक्त एकच गोष्ट करतात खोटी आश्वासनं देणं. आम्ही खोटी आश्वासनं देणार नाही. आमचं सरकार आल्यानंतर आम्ही सिलिंडरवर ५०० रुपयांची सबसिडी देऊ. बेरोजगार, मजूर, गरीब लोकांच्या खिशात पैसे कसे जातील आम्ही पाहू. मोदींना तसं वाटत नाही, त्यांना वाटतं सगळा पैसा अदाणींच्या खिशात जावा. शेतकरी, गरीब, छोटे दुकानदार, मजूर यांच्या खिशात पैसे गेले पाहिजेत यासाठी काँग्रेस प्रयत्न करतं आहे यापुढेही करणार आहे असंही राहुल गांधी म्हणाले.
छत्तीसगढ हे राज्य गरीब नाही. मात्र भाजपाचं सरकार आलं की इथला पैसा उद्योगपतींना दिला जातो आहे. त्यामुळे या सरकार गरीबांचं सरकार आलं पाहिजे. जे काम फक्त काँग्रेस करतं. आम्हाला गरीबांना मदत करणं ठाऊक आहे आणि भाजपाला उद्योजकांना मदत करणं ठाऊक आहे असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.