नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नव्हे तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अदानी यांना भ्रष्टचाराच्या प्रकरणांमध्ये संरक्षण देत आहेत. शरद पवार पंतप्रधान नाहीत, ते पंतप्रधान असते आणि त्यांनी अदानींना वाचवण्याचा प्रयत्न केला असता तर पवारांना प्रश्न विचारले असते, असे प्रत्युत्तर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोळसा खरेदीमध्ये अदानींनी घोटाळा केला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन बाळगले आहे. पंतप्रधानांच्या विश्वासार्हतेवर शंका घेतली जाऊ लागली असून मोदी अदानींना वाचवत असल्याचे गावागावांत लोकांना माहिती झाले आहे. अदानी प्रकरणावर मोदींनी स्पष्टीकरण द्यावे. त्यांनी चौकशीचे आदेश दिले तर त्यांच्या विश्वासार्हतेवर कोणी शंका घेणार नाही, असे राहुल गांधी म्हणाले. त्यावर, शरद पवार हेदेखील अदानींची गाठभेट घेत असतात, तुम्ही त्यांनाही प्रश्न विचारणार का, या प्रश्नावर राहुल गांधी यांनी, शरद पवार अदानींना संरक्षण देत नाहीत. ते पंतप्रधान नसल्यामुळे मी त्यांना यासंदर्भात एकही प्रश्न विचारलेला नाही, असे राजकीयदृष्टय़ा चोख उत्तर दिले. अदानी इंडोनेशियातून कोळसा आयात करतात, तिथून हा कोळसा भारतात येईपर्यंत त्याचे दर दुप्पट होतात. वाढीव दराने कोळसा खरेदी केल्याचे अदानी दाखवत असून त्या आधारावर देशातील विजेचे दर ठरवतात, त्यामुळे भारतात वीज महाग झाली असून अदानी लोकांच्या खिशातून १२ हजार कोटींची लूट करत आहेत, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

हेही वाचा >>>केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ ; रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस, रब्बीसाठी हमीभावात वाढ

अदानी घोटाळा २० हजार कोटी असल्याचे मी म्हणालो होतो पण, हा आकडा वाढत चालला असून तो आता ३२ हजार कोटींवर पोहोचला आहे. इंडोनेशियातून आयात केलेल्या कोळशामध्ये झालेल्या घोटाळय़ावर ‘फायनान्शिअल टाइम्स’ या वृत्तपत्राने प्रकाश टाकला आहे. मात्र, भारतात अदानींच्या घोटाळय़ाची दखल घेतली जात नाही. अदानी समूहाच्या गैरव्यवहारांची ‘सेबी’ चौकशी करत असली तरी, कागदपत्रे मिळत नसल्याचा दावा ‘सेबी’चे अधिकारी करत आहेत. इथे ‘फायनान्शिअल टाइम्स’ला कागदपत्रे मिळाली. सर्व पुराव्यांच्या आधारे अदानींनी कोळसा घोटाळा केल्याचा दावा हे वृत्तपत्र करत आहे. देशातील ‘सेबी’सारख्या संस्थेला पुरावे मिळत नाहीत कारण पंतप्रधान अदानींचे संरक्षण करत आहेत, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला.  

अदानींनी कोळशाचे दर कृत्रिमरीत्या वाढवल्यामुळे देशात विजेचे दरही जास्त आहेत. ही गरिबांची लूट असून काँग्रेसची सरकारे असलेल्या राज्यांमध्ये अदानीकडून वीज पुरवली जात असेल तर त्याची चौकशी केली जाईल, असे राहुल गांधी म्हणाले. अदानी गरिबांना न परवडणाऱ्या दरात वीज विकत असल्यामुळे कर्नाटकमध्ये काँग्रसला विजेवर अनुदान द्यावे लागले. मध्य प्रदेशमध्येही वीज अनुदान देऊ, असे आश्वासन राहुल गांधींनी दिले.

भाजपचा गांधी कुटुंबावर भ्रष्टाचाराचा आरोप

राहुल गांधी यांनी अदानी समूहावर केलेल्या आरोपांना भाजपतर्फे उत्तर देण्यात आले. अदानी समूहासंबंधी प्रकरण सर्वोच्च न्यायालयासमोर प्रलंबित असल्याचे भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी सांगितले. राहुल यांनी केलेल्या आरोपांवरून त्यांचा राज्यघटना किंवा सर्वोच्च न्यायालयावर विश्वास नसल्याचे दिसते असे भाटिया म्हणाले. गांधी कुटुंब हे देशातील सर्वात भ्रष्ट कुटुंब असल्याचा आरोपही त्यांनी केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi accuses rahul gandhi and adani corruption amy