Rahul Gandhi On Maharashtra Assembly Election Result : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी आज लोकसभेत केलेल्या भाषणात पुन्हा एकदा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावर प्रश्न उपस्थित केले आहेत. गेल्या वर्षी झालेल्या या निवडणुकीदरम्यान मतदार याद्यांमध्ये विसंगती आढळल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच या प्रकरणी निवडणूक आयोगाने इलेक्टोरल रोलवरील डेटा विरोधकांच्या महाविकास आघाडीला विश्लेषणासाठी द्यावा अशी मागणीही राहुल गांधी यांनी यावेळी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसभेतील राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावासंबंधी चर्चेत बोलताना राहुल गांधी यांनी आरोप केला की, लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर फक्त पाचच महिन्यानंतर नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणुकी दरम्यान महाराष्ट्रातील मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नावे जोडण्यात आली.

राहुल गांधी म्हणाले की, “मला महाराष्ट्र निवडणुकीबद्दल बोलायचे आहे. हिमाचल प्रदेशची संपूर्ण लोकसंख्या महाराष्ट्राच्या मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली. लोकसभा निवडणुकीनंतर, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात ७० लाख नवे मतदार अचानक तयार झाले.”

निवडणूक आयोगाने मतदार यादी संबंधित डेटा काँग्रेस , शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांना विश्लेषणासाठी दिला पाहिजे असेही राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी यांच्या या आरोपांवर निवडणूक आयोगाने कोणतेही उत्तर दिलेले नाही पण यापूर्वी निव़़डणूक आयोगाने मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात मतदार वाढल्याची किंवा कमी झाल्याची शक्यता नाकारली होती.

शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी राहुल गांधी यांचे आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटले आहे. “हा दावा (विधान) पूर्णपणे खोटा आणि बिनबुडाचा आहे. निवडणूक आयोगाने त्यांच्या वेबसाइटवर प्रत्येक मतदार यादी अपलोड केलेली आहे,” असेही शिंदे म्हणाले.

निकाल काय लागला होता?

नोव्हेंबर २० रोजी झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत विरोधकांच्या महाविकास आघाडीला २८८ पैकी अवघ्या ५० जागा जिंकता आल्या होत्या. ज्यामध्ये शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने २० जागा, काँग्रेस १६ जागा आणि राष्ट्रवादी (शरद पवार) १० जागा जिंकल्या होत्या, तर एक जागा अपक्ष आणि एक एआएमआयएमने जिंकली होती.

तर महायुतीला या निवडणुकीत २३५ जागांवर विजय मिळाला होता, ज्यामध्ये १३२ जागा भाजपाने, ५७ शिवसेना (शिंदे), ४१ राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि ५ जागा इतरांनी जिंकल्या होत्या.