सुधारित लोकपाल विधेयकावरून कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्यातील पत्रव्यवहारामुळे विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या भूवया उंचावल्या आहेत. सरकारी लोकपाल विधेयकात सुधारणा करून ते राज्यसभेत मांडल्याबद्दल अण्णा हजारे यांनी राहुल गांधी यांना पत्र लिहिले होते. राहुल गांधी यांनीही लगेचच या पत्राला उत्तर देऊन लोकपाल आणण्यासाठी अण्णा हजारेंनी बजावलेल्या भूमिकेबद्दल आभार मानले आहेत. एकीकडे आम आदमी पक्ष आणि अण्णा हजारे यांच्यात दरी वाढत असताना दुसरीकडे कॉंग्रेस आणि अण्णा हजारे यांच्यातील या पत्रव्यवहारामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क लढवले जाऊ लागलेत.
राहुल गांधी आणि अण्णा हजारे यांनी एकमेकांना पत्र लिहिल्याची माहिती कॉंग्रेसचे प्रवक्ते अजय माकन यांनी दिली. सुधारित लोकपाल विधेयकाला पाठिंबा दिल्याबद्दल राहुल गांधी यांना अण्णा हजारे यांचे आभार मानले आहेत. हे विधेयक आणण्यासाठी तुम्ही बजावलेल्या भूमिकेचा आम्ही आदर राखतो आणि विधेयकाला पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानतो, असे राहुल गांधी यांनी अण्णा हजारे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. देशात सक्षम लोकपाल आणण्यासाठी आमचा पक्ष कटिबद्ध असल्याचे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.