पीटीआय, नवी दिल्ली
‘इंडिया’ आघाडीची बुधवारी बैठक होणार असून त्यानंतर जुन्या मित्रांना संपर्क करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निकालानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. तर हा निकाल म्हणजे पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात जनतेने दिलेला कौल आहे, अशी बोचरी टीका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली.
भाजप जादुई आकड्यापासून दूर राहात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संध्याकाळी पाचच्या सुमारास गांधी आणि खरगे यांनी येथील काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी गांधी म्हणाले, ही लोकसभा राज्यघटना वाचविण्यासाठी लढली गेली होती आणि देशाची जनता त्यासाठी आमच्या मागे उभी राहील, याची आम्हाला खात्री होती. संविधान वाचविण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे आणि मोठे पाऊल आहे. वायनाड आणि रायबरेली यापैकी कोणती जागा सोडायची, याचा निर्णय अद्याप घेतला नाही, असे ते म्हणाले. यावेळी खरगे यांनी थेट पंतप्रधानांवर हल्लबोल केला. ‘हा जनतेचा निकाल आणि लोकशाहीचा विजय आहे. ही लढाई जनता विरुद्ध मोदी अशी असल्याचे आम्ही सांगत होतो. आम्ही नम्रपणे जनतेचा कौल स्वीकारला आहे,’ असे ते म्हणाले. कोणत्याही एका पक्षाला पूर्ण बहुमत मिळालेले नाही. विशेषत: ‘एक व्यक्ती एक चेहरा’ हे धोरण असलेल्या भाजपला मतदारांनी नाकारले आहे, असे खरगे म्हणाले.
हेही वाचा >>>“पब्लिक स्मार्ट आहे” अयोध्येत भाजपाच्या पदरी आलेल्या मोठ्या अपयशावर लोक काय म्हणाले, पाहा
हा भाजपचा राजकीय आणि नैतिक पराभव आहे. विरोधकांच्या प्रयत्नांत सरकारी यंत्रणांनी सातत्याने खोडा घातला. मोदी यांचे असत्य नजरेआड करून जनतेने काँग्रेसचा जाहीरनामा स्वीकारला आहे. – मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस अध्यक्ष