राफेल प्रकरणात सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना खडे बोल सुनावले आहे. सूर्यावर कितीही चिखलफेक केली तरी त्याचे तेज कमी होत नाही हे राहुल गांधींनी लक्षात ठेवावे. तसेच यापुढे भविष्यात त्यांनी असे बालिशपणाचे आरोप करु नये असा सल्ला देखील अमित शाहांनी दिला आहे.

राफेल करारात अनियमितता नसल्याचे स्पष्टीकरण सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी दिले असून या पार्श्वभूमीवर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी पत्रकार परिषद घेत राहुल गांधींवर टीकेची झोड उठवली. काँग्रेस एका काल्पनिक विश्वात रमली असून त्या विश्वात सत्य आणि न्यायाला स्थानच नाही. प्रश्नही काँग्रेसकडून उपस्थित केला जातो, वकील पण तेच असतात आणि न्यायाधीशही तेच असतात, असा टोला त्यांनी लगावला. राहुल गांधींच्या आरोपांनंतरही देशातील जनतेने कधीही नरेंद्र मोदींच्या प्रामाणिकपणावर शंका घेतलेली नाही. देशाच्या सुरक्षेसंदर्भात तथ्यहिन आरोप करणे चुकीचे आहे, हा धडा काँग्रेसने या प्रकरणातून घ्यावा, असेही त्यांनी म्हटले आहे.

राहुल गांधींनी कोणाच्या माहितीच्या आधारे इतके गंभीर आरोप केले, ही माहिती त्यांना कोणी दिली, असा सवाल अमित शाहांनी विचारला. मी राहुल गांधींसारखे तथ्यहिन आरोप करत नाही, त्यांच्या माहितीचा स्त्रोत कुठून होता हे त्यांनी जाहीर केलंच पाहिजे, असा पुनरुच्चार त्यांनी केला. खोटे बोलण्याची सर्वांनाच मुभा आहे, असे सांगत त्यांनी राहुल गांधींवर कायदेशीर कारवाई करणार नसल्याचे सांगितले. पाच राज्यांमधील निकालावर अमित शाहांनी प्रतिक्रिया देणे टाळले. मी यासंदर्भात दोन ते तीन दिवसांनी उत्तर देईन, असेही त्यांनी सांगितले.

Story img Loader