Karnatak Election 2023 : कर्नाटकात निवडणूक प्रचाराला जोर आला आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते अधिक जोमाने कामाला लागले आहेत. भाजपाचा सुरूंगही फोडण्याचा प्रयत्न केला जातोय. माजी मुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांनी भाजपाला रामराम ठोकल्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे कर्नाटकात काँग्रेसला बळ मिळाल्याची चर्चा आहे. त्यातच, आज (१६ एप्रिल) कर्नाटकच्या कोलार भागात राहुल गांधी यांनी प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी पुन्हा अदाणी मुद्द्यांवरून भाजपाला घेरलं.
हेही वाचा >> विश्लेषण: बंडाळी रोखण्यावरच कर्नाटकात सत्तेचे गणित अवलंबून?
“अदानीची शेल कंपनी आहे. या कंपनीतील २० हजार कोटी कोणाचे आहेत? भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलंय की सत्ताधारी पक्षानेच संसदेचं कामकाज होऊ दिलं नाही. सहसा विरोधक संसदेतील कामकाज बंद पाडतात. परंतु, पहिल्यांदाच मंत्र्यांनीच कामकाज थांबवले”, असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी कर्नाटकात केला. ते पुढे म्हणाले की, “मी लोकसभेच्या अध्यक्षांना दोनवेळा पत्र लिहिले, की माझ्यावर झालेल्या आरोपांवर मला बोलायचं आहे. पण मला बोलायची संधी दिली गेली नाही. ते माझ्यावर हसले आणि मला म्हणाले मी काहीच करू शकत नाही. मी म्हणालो की तुम्ही अध्यक्ष आहात, तुम्ही संसदेत काहीही करू शकता, पण तुम्ही तरीही तुमचं काम का करत नाहीत? ते अदाणी प्रकरण संसदेत आणण्यास घाबरत होते. त्यानंतर माझी खासदारकीच रद्द झाली”, असं राहुल गांधी म्हणाले.
भाजपाने पैशांची चोरी केली
“कर्नाटकात भाजपा सरकारने काय केलं? त्यांनी ४० टक्के कमिशन खाललं. काम करण्यासाठी भाजपा सरकारने कर्नाटकातील लोकांच्या पैशांची चोरी केली. त्यांनी जे काही केलं ते ४० टक्के कमिशनसाठी केलं. हे मी बोलत नसून कंत्राटदारांच्या संघटनांनी पंतप्रधांनाना पत्र लिहून कळवलं आहे. पंतप्रधानांनी या पत्राचंही उत्तर दिलेलं नाही. पत्राचं उत्तर न देण्याचा अर्थ असा की पंतप्रधानांनासुद्धा कर्नाटकातील ४० टक्के कमिशन मान्य आहे.”
हेही वाचा >> Karnataka election 2023 : काँग्रेसच्या तिसऱ्या यादीत माजी उपमुख्यमंत्री सावदी
ते पुढे म्हणाले की, “तुम्ही जर हजारो करोड रुपये अदाणींना देऊ शकता तर आम्हा गरीब, महिला, तरुणांनाही पैसे देऊ शकता. तुम्ही अदाणींची मनापासून मदत केली, आता आम्ही कर्नाटक लोकांना मनापासून मदत करणार आहोत.”
कोलारमधील भाषणामुळेच रद्द झाली खासदारकी
दरम्यान, चार वर्षांपूर्वी याच कोलारमध्ये राहुल गांधींनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाषण केलं होतं. ज्यात त्यांनी मोदी आडनावावरून टीका केली होती. यामुळे त्यांची खासदारकी रद्द झाली आहे. त्याच कोलारमधून त्यांनी आज पुन्हा मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.