भाजप- काँग्रेसची एकमेकांवर जोरदार टीका
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पाकिस्तानमधील बालाकोट येथे करण्यात आलेल्या भारतीय हवाई हल्ल्यावरून शनिवारी भारतीय राजकीय पटलावर जोरदार वाक् युद्ध रंगले.
मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ मध्ये झालेला दहशतवादी हल्ला हाताळण्यात काँग्रेस सरकारला अपयश आल्याची आठवण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून दिली. तर पुलवामा येथे जैश-ए-महंमद या संघटनेच्या माध्यमातून दहशतवादी हल्ला घडविणाऱ्या मसूद अझर या दहशतवाद्याला भारताच्या कैदेतून भाजपनेच सोडले, हे मोदी यांनी जाहीरपणे सांगावे, असे आवाहन राहुल गांधी यांनी केले.
भारताने २४ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीच्या सुमारास बालाकोट येथे हवाई हल्ले केल्यानंतर शांतपणे परिस्थिती हाताळत असतानाच पहाटे ५ वाजता पाकिस्तानने ‘मोदींनी आमच्यावर हल्ला केला’ असे गळे काढण्यास सुरुवात केली. याचे कारण २०१४ पूर्वी भारतात ‘रिमोट कंट्रोल’ सरकार होते, त्यामुळे भारत काही करत नाही, असा पाकिस्तानचा समज झाला होता. त्यामुळे यावेळीही काही होणार नाही असे त्यांना वाटत होते असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रेटर नॉएडा येथे केले.
पाकिस्तानातील बालाकोट येथील हवाई हल्ल्याचे पुरावे मागणाऱ्यांवर त्यांनी जोरदार हल्ला चढविला. ‘आपण भारताला घायाळ करीत राहू, हल्ले करीत राहू, छुपे युद्ध चालू ठेवू व भारत प्रतिसाद देणार नाही असे पाकिस्तानला वाटत होते, या मुद्दय़ाचा त्यांनी पुनरुच्चार केला. तुम्हा लोकांना निष्क्रिय सरकार चालेल का? झोपणारा चौकीदार (पंतप्रधान) तुम्हाला चालेल का, असा सवालही त्यांनी केला.
उरी हल्ल्यानंतर विरोधकांनी पुरावे मागितले, आमच्या सैनिकांनी यापूर्वी जे झाले नाही ते करून दाख वले, त्यांनी दहशतवाद्यांना घरात घुसून मारले. दहशतवाद्यांना आणि त्यांना पोसणाऱ्यांना अशी कारवाई अपेक्षित नव्हती. त्यांना वाटले भारताने एकदा लक्ष्यभेद हल्ला केला, फार तर पुन्हा त्याच प्रकारचा हल्ला होईल, म्हणून त्यांनी सीमेवर सैन्य जमा केले. पण आम्ही हवाई हल्ले करून त्यांचे अंदाज चुकवले, असेही मोदी यांनी या वेळी म्हटले.
बालाकोट हवाई हल्ल्यानंतर काही राजकीय पक्ष सातत्याने करत असलेल्या वक्तव्यांचा फायदा पाकिस्तान उठवत आहे. लोकांचा विश्वास असेल तर त्यांनीच अशा लोकांना ओळखून त्यांच्याविषयी निर्णय घ्यावा. ‘आज हर भ्रष्ट को मोदी से कष्ट है’, असे सांगत मोदी म्हणाले की मतं मिळवण्यासाठी आज चौकीदारावर आरोप करण्याची स्पर्धाच लागली आहे, पण त्यांच्या लक्षात येत नाही की मोदींना विरोध करण्याच्या नादात ते आता देशाला विरोध करू लागले आहेत, असा आरोपही मोदी यांनी केला.
राहुल यांचेही उत्तर..
उत्तर कर्नाटकातील एका जाहीर सभेत राहुल गांधी यांनी मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. पाकिस्तानी दहशतवादी अझर याला भारताने आयसी ८१४ या विमानाच्या अपहरणावेळी प्रवाशांच्या सुटकेच्या बदल्यात १९९९ मध्ये सोडून दिले होते, त्या वेळी वाजपेयी यांचे सरकार होते, मोदी यांनी त्याबाबत बोलावे, असे राहुल गांधी म्हणाले. गांधी यांनी असा आरोप केला,की मोदी हे भ्रष्टाचाराची चर्चा करतात पण तेच भ्रष्ट आहेत हे देशाला माहिती आहे.
मोदी हे गेली पाच वर्षे देशातील लोकांना मूर्खात काढत आहेत. त्यांचे मेक इन इंडिया, स्टँड अप इंडिया, सिट डाऊन इंडिया असले सगळे कार्यक्रम फसले आहेत, अशी टीका त्यांनी केली.
२०१४ पूर्वी भारतात रिमोट कंट्रोल सरकार होते, त्यामुळे भारत काही करत नाही, असा पाकिस्तानचा समज झाला होता. आजचा भारत ‘नयी रिती नयी नीती’वर चालणारा आहे. २०१६ मध्ये उरी येथे दहशतवादी हल्ला झाला होता त्या वेळी आम्ही प्रथमच दहशतवाद्यांना त्यांच्याच भाषेत म्हणजे लक्ष्यभेद हल्ला करून सडेतोड उत्तर दिले होते. – नरेंद्र मोदी
भाजप सरकारने १९९९ मध्ये मसूद अझर याला कंदहार येथे अफगाणिस्तानात नेऊन सोडून दिले. त्याविषयी तुम्ही का बोलत नाही. केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांवर हल्ला करणारा मसूद अझर आधी भारताच्या ताब्यात होता, त्याला भाजपने पाकिस्तानात नेऊन सोडले. मोदीजी आम्ही तुमच्यासारखे नाही. आम्ही दहशतवादासमोर झुकत नाही. मसूद अझरला कुणी सोडून दिले हे लोकांना स्पष्टपणे सांगा – राहुल गांधी
सीमेपार तीन हल्ले..
गेल्या पाच वर्षांत भारताने सीमेपलीकडे तीन लक्ष्यभेदी हल्ले केले आहेत, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी सांगितले. उरीतील दहशतवादी हल्ल्यानंतर २०१६ सालचा लक्ष्यभेदी हल्ला आणि पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावरील दहशतवादी हल्ल्यानंतर करण्यात आलेला हवाई हल्ला यांचा सिंह यांनी उल्लेख केला, मात्र तिसऱ्या हल्ल्याचा तपशील त्यांनी दिला नाही.
पाकिस्तानच्या कृतीला महत्त्व..
पाकिस्तानचे दहशतवाद निर्मूलनाबाबतचे मूल्यमापन उक्तीवर नव्हे तर कृतीवर अवलंबन असणार आहे, त्यामुळे नव्या पाकिस्तानने दहशतवादावर नवी कृती करून दाखवणे आवश्यक आहे, असे भारताच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी सांगितले.