पीटीआय, हैदराबाद
तेलंगणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सत्ता मिळाली तर महिलांना दरमहा चार हजार रुपयांपर्यंत लाभ मिळू शकेल, असे आश्वासन पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी दिले. काँग्रेस सत्तेत आल्यास महिलांना सामाजिक पेन्शन, स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरवर बचत आणि सरकारी बसमधून मोफत प्रवास दिला जाईल असे राहुल म्हणाले.
तेलंगणातील कालेश्वरम प्रकल्पाच्या मेदिगड्डा धरणाजवळ अंबातीपल्ली येथे महिलांच्या मेळाव्यात बोलताना राहुल यांनी काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन केले. तेलंगणामध्ये बीआरएस सरकारने १ लाख कोटी रुपयांची लूट केल्याचा आरोप त्यांनी केला. राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी कथितरीत्या ‘लुटलेला’ सर्व पैसा लोकांना परत देण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे असे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या भ्रष्टाचारामुळे तेलंगणातील महिलांना सर्वाधिक फटका बसला, असा आरोपही राहुल यांनी केला.
हेही वाचा >>>Israel – Hamas War : गाझा पट्टीत हमासच्या हल्ल्यात भारतीय वंशाच्या इस्रायल सैनिकाचा मृत्यू
चार हजार रुपयांचा हिशेब मांडताना राहुल यांनी सांगितले की, सामाजिक पेन्शन म्हणून महिलांच्या बँक खात्यात दरमहा २,५०० रुपये जमा केले जातील. सध्या एक हजार रुपयांना मिळणारा गॅस सिलिंडर ५०० रुपयांना दिला जाईल आणि सरकारी बसमध्ये प्रवास करून दरमहा एक हजार रुपये वाचतील, अशा प्रकारे महिलांना दरमहा चार हजार रुपयांपर्यंत लाभ मिळू शकतो असे ते म्हणाले.