“भारतातील लोकशाहीची रोज हत्या होत असून देशातील लोकशाही पूर्णपणे संपली आहे. महागाई, बेरोजगारीसारखे सर्वसामान्यांचे प्रश्न आम्हाला मांडायचे आहेत, मात्र आम्हाला दडपशाहीच्या मार्गाने करण्यात येत आहे. काँग्रेसने ७० वर्षात जे कमावले ते भाजपाने ८ वर्षात गमावल्याचा” आरोप काँग्रेस नेते राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत केला आहे. देशात लोकशाहीची हत्या होत असून सर्वजण तमाशा पाहत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
हेही वाचा- तुमच्या पक्षात लोकशाही आहे का? राहुल गांधींच्या टीकेला भाजपाचं प्रत्युत्तर
राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
महागाई आणि बेरोजगारीविरोधात देशव्यापी आंदोलनाची घोषणा काँग्रेसकडून करण्यात आली आहे. आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यकर्ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दिल्लीतील निवास्थानाला घेराव घालण्याच्या तयारीत आहेत. “विरोधी पक्षांना पाठिंबा देणाऱ्यांच्या मागे ईडी आणि सीबीआय लावली जाते. त्यामुळे विरोधकांचा प्रभाव दिसून येत नाही. केंद्र सरकारविरोधात जेवढं मी बोलेन तेवढी माझ्यावर कारवाई केली जाईल. पण मी कारवाईला घाबरत नाही. जो धमकावतो तोच घाबरतो. हे लोक २४ तास खोटं बोलण्याचे काम करतात. त्यांना महागाई आणि बेरोजगारीसोबत दिलेल्या आश्वसानाचीही भीती वाटत” असल्याची टीका राहूल गांधींनी केली आहे. भारतात ५ दशलक्ष लोकांचा करोनामुळे मृत्यू झाल्याचा दावा संयुक्त राष्ट्र संघटनेने केला आहे. मात्र, केंद्र सरकारने हा दावा खोटा असल्याचे म्हणले आहे. यावरुनही राहुल गांधींनी सरकारवर निशाणा साधला आहे.
हेही वाचा- गृहकर्जे, वाहनकर्जे महागणार; व्याजदरांमध्ये RBI कडून अर्ध्या टक्क्याची वाढ
मल्लिकार्जुन खर्गेंच्या ईडी चौकशीचा विरोध
नॅशनल हेराल्ड प्रकरणी संसदेच्या अधिवेशनादरम्यान राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. संसदेचे कामकाज सुरू असताना अशा परिस्थितीत खर्गे यांना बोलावणे हा लोकशाहीतील विधिमंडळाचा अपमान असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ट्वीट करत मोदीशाहीची पातळी सातत्याने घसरत असल्याची टीका केली आहे. सोनिया आणि राहुल गांधी यांच्या निवासस्थानांना पोलिसांनी घेराव घातला आहे. असे सुरु राहिलं तर आपली लोकशाही टिकेल का? आमचे मनोधैर्य खचावे यासाठी हे सगळं केले जात आहे. पण आम्ही घाबरणार नसल्याचे खर्गे यांनी स्पष्ट केले आहे.