काँग्रेसच्या नेतृत्व परिषदेत सीतारामन यांना कोपरखळी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वायनाड : तुम्ही काय खाता हे कुणीही विचारलेले नाही, मात्र अर्थव्यवस्था संकटात का सापडली आहे हे लोक जाणू इच्छितात, अशा शब्दांत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना कोपरखळी मारली.

देशात कांद्याचे भाव गगनाला भिडले असताना, तुम्ही कांदे खाता काय, असा प्रश्न एका खासदाराने बुधवारी विचारला असता, ‘मी कांदे व लसूण न खाणाऱ्या कुटुंबातील आहे,’ असे उत्तर सीतारामन यांनी संसदेत दिले होते.

‘तुम्ही कांदे खाता की नाही, हे कुणीही तुम्हाला विचारत नाही. तुम्ही अर्थमंत्री आहात आणि अर्थव्यवस्था डळमळीत का झाली आहे हे आम्ही विचारत आहोत. तुम्ही सगळ्यात गरीब माणसाला विचाराल, तरी तो समजूतदारपणाचे उत्तर देईल,’ असे काँग्रेसच्या नेतृत्व परिषदेत बोलताना राहुल गांधी म्हणाले.

‘आमचा लोकांच्या आवाजावर विश्वास आहे, पण मोदी यांचा स्वत:च्या आवाजावरच विश्वास आहे. त्यांनी कुठल्याही दुकानदाराला नोटाबंदीबाबत विचारले नाही आणि कुणा शेतकऱ्याला किंवा कुणालाही त्याबद्दल विचारणा केली नाही. भारताची सगळ्यात मोठी ताकद असलेली अर्थव्यवस्था त्यांनी नष्ट केली. जीएसटीच्या बाबतीतही त्यांनी हेच केले. आता परिस्थिती किती विचित्र झाली आहे हे तुम्ही पाहता आहातच,’ असे गांधी यांनी सांगितले.

स्वत:च्याच लोकांना मारहाण करण्यावर आणि त्यांची हत्या करण्यावर आमचा विश्वास नाही. त्यामुळेच आम्ही राष्ट्रीय स्तरावर लढत आहोत, असे वायनाडचे खासदार असलेले राहुल म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi attacks nirmala sitharaman over onion remarks in parliament zws