Rahul Gandhi Attempt of Murder Case Remove in Parliament Scuffle : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे काँग्रेसने देशभर आंदोलन पुकारले. तसंच, इंडिया आघाडीच्या खासदारांनीही संसद परिसरात आंदोलन केलं. यावेळी भाजपा-इंडिया आघाडीचे खासदार आमने सामने आले होते. यात दोन्ही गटांच्या खासदारांमध्ये धक्काबुक्की होत भाजपाचे दोन खासदार जखमीही झाले. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल केलाय. त्यांच्याविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचाही गुन्हा दाखल केला होता. परंतु, तो आता मागे घेण्यात आला आहे. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

अनुराग ठाकूर, बन्सुरी स्वराज आणि हेमांग जोशी यांच्यासह भाजपा नेत्यांनी संसद मार्ग पोलीस ठाण्यात राहुल गांधी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. अनुराग ठाकूर यांनी केलेल्या तक्रारीनुसार राहुल गांधींविरोधात कलम १०९ (हत्येचा प्रयत्न), ११५ (दुखापत करणे), ११७ (गंभीर दुखापत करणे), कलम १२५ (इतरांच्या जीवाला धोकयात आणण्याचे कृत्य), कलम १३१ (सखोल तपासणीची मागणी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. दरम्यान, पोलिसांनी राहुल गांधी यांच्याविरोधात १०९ हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा काढून टाकला आहे. परंतु इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हेही वाचा >> Attempt To Murder : राहुल गांधींविरोधात हत्येच्या प्रयत्नाची तक्रार; संसदेत खासदार जखमी झाल्यानंतर भाजपाकडून मोठे पाऊल

राहुल गांधी यांच्यामुळे दोन खासदार जखमी झाल्याचा आरोप भाजपाने केल्यानंतर काँग्रेसनेही पलटवार केला आहे. भाजपा खासदारांनी मल्लिकार्जुन खरगे यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप काँग्रेस खासदारांनी केला. त्यामुळे काँग्रेसनेही भाजपाविरोधात गुन्हा दाखल केला.

नेमकं प्रकरण काय?

अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या विधानानंतर काँग्रेससह इंडिया आघाडीच्या खासदारांनी संसद परिसरात आंदोलन केले होते. त्यावेळी संसदेच्या मकरद्वारापाशी काँग्रेस आणि भाजपा आमदार आमने-सामने आले. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या खासदारांमध्ये धक्काबुक्की झाली, यामध्ये भाजपाचे ओडिशातील खासदार प्रताप चंद्र सारंगी आणि खासदार मुकेश राजपूत जखमी झाले होते. दरम्यान राहुल गांधींनी दुसऱ्या एका खासदाराला धक्का दिल्यामुळे आपल्याला जखम झाल्याचा आरोप प्रताप चंद्र सारंगी यांनी केली आहे. त्यानंतर आता भाजपाने दिल्लीतील संसद मार्ग ठाण्यात राहुल गांधी यांच्याविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याची तक्रार दाखल केली.

लोकसभा अध्यक्षांकडून निर्देश जारी

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कठोर निर्देश जारी केले की कोणतेही सदस्य किंवा सदस्यांचे गट किंवा राजकीय पक्षांनी संसद भवनाच्या कोणत्याही इमारतीच्या गेटवर निदर्शने करू नयेत, असं वृत्त एएनआयने दिलं आहे.

v

Story img Loader