काँग्रेस खासदार राहुल गांधी गेल्या काही महिन्यांपासून ‘भारत जोडो’ यात्रेच्या निमित्ताने चर्चेत राहिले आहेत. शिवाय, यात्रा महाराष्ट्रात आल्यानंतर हिंगोलीतील सभेत त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी केलेल्या विधानावरून बराच वादही झाल्याचं पाहायला मिळालं. या यात्रेदरम्यान राहुल गांधींचे अनेक फोटो आणि व्हिडीओ चर्चेचा विषय ठरले आहेत. आता त्यांचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होत असून या व्हिडीओमध्ये राहुल गांधींसमवेत त्यांच्या भगिनी प्रियांका गांधी यादेखील दिसत आहेत. विशेष म्हणजे व्हिडिओमध्ये या दोघांच्या हातात धनुष्यबाण दिसत असल्यामुळे याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
काँग्रेस पक्षानं ट्वीट केला व्हिडीओ!
काँग्रेस पक्षानं राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेदरम्यानचा हा व्हिडीओ ट्वीट केला आहे. भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात दाखल झाली असून यात्रेच्या दुसऱ्या दिवशी प्रियांका गांधी, त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा आणि त्यांचा मुलगा बोरगाव परिसरात यात्रेमध्ये सहभागी झाले. त्याच्यासमवेत राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे महत्त्वाचे नेते सचिन पायलट हेही यात्रेमध्ये सहभागी झाल्याचं दिसून आलं. यादरम्यान, प्रियांका गांधी आणि राहुल गांधी यांचा एक व्हिडीओ काँग्रेसनं ट्वीट केला आहे.
काय आहे व्हिडीओमध्ये?
“आरंभ है प्रचंड” असं ट्वीट हा व्हिडीओ शेअर करताना काँग्रेस पक्षाकडून करण्यात आलं आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीलाच प्रियांका गांधी हातात धनुष्यबाण घेऊन समोर निशाणा साधण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. त्यांच्याबाजूला राहुल गांधी उभे असून ते प्रियांका गांधींना बाण मारण्यासंबंधी मार्गदर्शन करत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. त्यानंतर पुढच्या दृश्यांमध्ये राहुल गांधी स्वत: धनुष्यबाण हातात धरून उभे असल्याचं दिसत आहे.
राहुल गांधी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत भारत जोडो यात्रेदरम्यान देशातील विविध भागांमधून प्रवास करणार आहेत. आत्तापर्यंत त्यांनी केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, महाराष्टर या राज्यांमधून प्रवास केला असून आता भारत जोडो यात्रा मध्य प्रदेशमध्ये दाखल झाली आहे. या यात्रेला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत असल्याचा दावा काँग्रेसकडून केला जात आहे.