यंदाच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान वाराणसीत काँग्रेसचे उमेदवार अजय राय आणि नरेंद्र मोदी यांच्यात चुरशीची लढत बघायला मिळाली. या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा केवळ दीड लाख मतांच्या फरकाने विजय झाला. यावरून राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु असताना आता राहुल गांधी यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. जर वाराणसीतून प्रियंका गांधी यांनी निवडणूक लढवली असती, तर नरेंद्र मोदी यांच्या मोठ्या फरकाने पराभव झाला असता, असे ते म्हणाले.
उत्तर प्रदेशातील विजयानंतर आज काँग्रेसकडून रायबरेलीत धन्यवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलं. तसेच त्यांनी अयोध्येतील पराभव आणि वाराणतील निकालावरही भाष्य केलं. महत्त्वाचे म्हणजे यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशच्या जनतेचे आभारही मानले.
हेही वाचा – Lok Sabha Results : राहुल गांधींच्या ‘भारत जोडो यात्रे’ला यश; काँग्रेसने किती जागा जिंकल्या?
नेमंक काय म्हणाले राहुल गांधी?
“मी आज रायबरेलीच्या जनेतचे आभार मानतो, त्यांच्यामुळेच आज काँग्रेस पक्षाला रायबरेलीत विजय मिळाला आहे. या निवडणुकीत काँग्रेस पक्ष उत्तर प्रदेशासह संपूर्ण भारतात एक होऊन लढला. गेल्या १० वर्षात मोदी आणि अमित शाह यांनी देशाचे संविधान बदलण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे देशातील जनतेने भाजपाच्या विरोधात मतदान केलं. देशातील जनतेने हिंसा आणि द्वेषाचं राजकारण नाकारलं आहे”, असं राहुल गांधी म्हणाले.
यावेळी बोलताना त्यांनी वारणसीतील निकालावरही भाष्य केलं. “वाराणसीत नरेंद्र मोदींचा पराभव होता होता वाचला. जर वाराणसीतून प्रियंका गांधी यांनी निवडणूक लढवली असती, तर आज नरेंद्र मोदी वाराणसीतून दोन ते तीन लाख मतांनी पराभूत झाले असते. मी हे अहंकारातून बोलत नाही. तर मी हे म्हणतोय कारण भारताच्या पंतप्रधांनांना देशातील जनतेने संदेश दिला आहे”, अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली.
राहुल गांधी यांनी अयोध्येतील पराभवावरूनही भाजपला लक्ष्य केलं. “या निवडणुकीत अयोध्येतही भाजपाचा पराभव झाला आहे. या ठिकाणी भाजपाने राम मंदिर बनवले. मात्र, या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान एकही गरीब व्यक्ती तिथे नव्हता. मागासवर्गीय व्यक्ती तिथे नव्हता, इतकंच काय तर, केवळ आदिवासी समाजातून येत असल्याने देशाच्या राष्ट्रपतींनाही आमंत्रण देण्यात आलं नव्हतं. त्याठिकाणी अदाणी अंबानी, बॉलिवूड, खेळाडू होते. मात्र, गरीब जनता नव्हती, त्यामुळे अयोध्येतील जनतेने भाजपाला उत्तर दिलं आहे”, असे ते म्हणाले.
हेही वाचा – ‘युवराज’ ते धीरोदात्त नेता!
दरम्यान,एनडीएच्या बैठकीत पंतप्रधान मोदींच्या संविधानासमोर नतमस्तक होण्याच्या कृतीवरूनही त्यांनी टोला लगावला. “काही दिवसांपूर्वीच आपण सर्वांनी मोदींना संविधानापुढे नतमस्तक होताना बघितलं आहे. हे केवळ देशातील जनतेमुळे शक्य झालं आहे, अशी टिप्पणी त्यांनी केली. तसेच ही फक्त सुरुवात असून आपल्या खांद्यावर आता मोठी जबाबदारी आहे”, असेही ते म्हणाले.