पीटीआय, पाटणा
बिहारमध्ये नितीशकुमार सरकारने जनतेला फसविण्यासाठी जातीनिहाय सर्वेक्षण केले, असा आरोप काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. ते पाटणा येथील बापू सभागृहात आयोजित संविधान सुरक्षा संमेलनाला संबोधित करीत होते. देशात विकास कामांचे नियोजन करण्यासाठी जनगणना महत्त्वाची असल्याचे सांगत काँग्रेस जातनिहाय जनगणनेच्या मागणीवर ठाम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी राहुल गांधी यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर देशातील संविधान कमकुवत करण्याचा आणि उपेक्षित समुदायांची उपेक्षा केल्याचा आरोप केला. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे ‘खरे स्वातंत्र्य’ हे वक्तव्य देशाच्या संविधानाविरोधात असल्याचा आरोपही त्यांनी केला. एससी, एसटी आणि ओबीसींसाठी आरक्षणावरील ५० टक्के मर्यादा पुरेशी नसल्याचा दावादेखील राहुल गांधी यांनी केला.

हेही वाचा : सैफ अली खान हल्ल्यातील संशयित आरोपी छत्तीसगडमधून ताब्यात, मुंबई पोलिसांच्या मदतीने आरपीएफने कसा लावला छडा?

संघ आणि त्यांचे समर्थक, काही निवडक संघटना ज्यात औद्याोगिक घराणेही आहेत तेच देश चालवीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. देशाची राज्यघटना केवळ पुस्तक नसून दलितांवर होणारे अत्याचाराला वाचा फोडते, असे ते म्हणाले. यासोबतच संविधान वाचवणारे आणि द्वेष पसरवणारे यांच्यात राजकीय लढाई सुरू असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.

नोकरशाही आणि इतर क्षेत्रांत ओबीसी, दलित आणि कामगारांचा सहभाग किती प्रमाणात आहे हे शोधण्यासाठी देशभरात जातीनिहाय जनगणना महत्त्वाची आहे. याचा उद्देश केवळ विविध जातींची संख्या जाणून घेणे नसून देशाच्या संपत्तीत त्यांचा वाटादेखील आहे.

राहुल गांधी, विरोधी पक्षनेते, लोकसभा

Story img Loader