Rahul Gandhi Video : केंद्रीय अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या विधानाचे पडसाद आज संसदेच्या हिवाळी अधिवेशनात देखील पाहायला मिळाले. आज संसदेबाहेर इंडिया आघाडीच्या आंदोलनादरम्यान भाजपा खसदार आणि विरोधी पक्षांचे नेते यांच्यात धक्काबुक्की झाली, ज्यामध्ये भाजपाचे खासदार प्रताप चंद्र सारंगी यांना दुखापत झाली. यानंतर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर सारंगी यांना धक्का देऊन पाडल्याचा आरोप करण्यात आला आहे. यादरम्यान जखमी झालेल्या सारंगी यांनी पाहायला गेलेल्या राहुल गांधींना भाजपाच्या खासदारांच्या रोषाला सामोरे जावे लागले. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.
“तुम्हाला लाज वाटत नाही का? हे काय राहुल दादागिरी करता… वृद्ध व्यक्तीला धक्का देऊन पाडलेत”, अशा शब्दात भाजपाचे खासदार निशीकांत दुबे राहुल गांधी यांना जाब विचारताना या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. तसेच इतर खासदार देखील राहुल गांधी यांना प्रश्न विचारत आहेत. तर यावर राहुल गांधी “मी त्यांना ढकललं नाही, त्यांनीच मला ढकललं” असे म्हणताना ऐकू येत आहे.
“कॅमेऱ्यामध्ये देखील हे रेकॉर्ड झाले असेल. भाजपा खासदार आम्हाला संसदेत जाण्याापासून रोखत होते. त्यांनी आम्हाला अडवले आणि धमकी दिली. आंदोलन करणे आमचा अधिकार आहे”, असेही राहुल गांधी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हणाले. गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या विधानानंतर गुरूवारी संसदेबाहेर झालेल्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या खासदारांच्या निषेध आंदोलनादरम्यान घडली.
काय आहेत जखमी खासदाराचे आरोप?
संसद भवन परिसरात घडलेल्या या सर्व प्रकारावर बोलताना भाजपाचे खासदार प्रताप चंद्र सारंगी म्हणाले, “मी पायऱ्यांवर उभा होतो. तेव्हा राहुल गांधी यांनी खासदार मुकेश राजपूत यांना धक्का दिला. त्यामुळे ते माझ्या अंगावर पडल्यानेही मी सुद्धा जखमी झालो.” दरम्यान या घटनेत खासदार प्रताप चंद्र सारंगी आणि खासदार मुकेश राजपूत जखमी झाले आहेत. या दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
भाजपा खासदाराकडून करण्यात आलेल्या आरोपांवर राहुल गांधी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. दरम्यान या आरोपांना उत्तर देताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी म्हणाले की, “मी प्रवेशद्वाराजवळ उभा होतो तेव्हा भाजपाचे खासदार माझी वाट अडवत होते. ते मला धमकी देत मला धक्काबुक्की करत होते.”
यादरम्यान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहीले आहे. ज्यामध्ये त्यांनी या संपूर्ण प्रकारणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच खरगे यांनी त्यांच्या पत्रात आपल्याला भाजपा खासदाराने ढकल्याचा दावा देखील केला आहे.
विरोधकांकडून संसदेच्या परिसरात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी करत तीव्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व राहुल गांधी करत होते. काँग्रेसकडून यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर दुसरीकडे भाजपाकडून या आंदोलनाचा निषेध करण्यात आला.