माजुली : भाजप देशातील आदिवासींना जंगलांपुरतेच मर्यादित ठेवू इच्छितो आणि त्यांना शिक्षण व इतर संधींपासून वंचित ठेवू पाहतो असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी केला. भारत जोडो यात्रा शुक्रवारी सकाळी जोरहाटमधून हे ब्रह्मपुत्रा नदीतील बेट असलेल्या माजुलीकडे सुरू झाली. राहुल गांधी आणि इतर काँग्रेस नेत्यांनी जोरहाट जिल्ह्यातील निमतीघाट येथून माजुलीतील आफलामुख घाट येथे जाण्यासाठी नावेने प्रवास केला.
माजुली येथे पोहोचल्यावर राहुल यांनी जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी भाजपकडून आदिवासींचा उल्लेख वनवासी असा केला जात असल्याबद्दल जोरदार टीका केली. दरम्यान, यात्रा आसाममध्ये पोहोचल्यापासून यात्रेचे संयोजक व राज्य सरकार यांच्यात खटके उडत आहेत. त्यावर काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश आणि प्रदेशाध्यक्ष भुपेन कुमार बोरा यांनी टीका केली.
हेही वाचा >>> ‘या’ देशाचं भारताच्या पावलावर पाऊल, चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा पाचवा देश, चौथ्या प्रयत्नात यशस्वी
यात्रेसाठी विविध परवानग्यांची अट असण्याचे कारण काय असा प्रश्न बोरा यांनी विचारला. हे लोकशाहीच्या तत्त्वाला धरून नसल्याची टीका त्यांनी केली. यात्रेचे राज्यातील आयोजक के बी बायजू यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, त्यांचा यात्रेच्या मार्गाशी काहीही संबंध नाही. आम्ही मार्ग निश्चित करून पोलिसांकडे परवानगी मागितली होती असे बोरा यांनी सांगितले.
गेल्या दोन दिवसांमध्ये आम्हाला आसाममध्ये जितक्या समस्या आल्या तितक्या इतर कुठेही आल्या नाहीत. पहिल्या भारत जोडो यात्रेला भाजप-शासित राज्यांमधून जातानाही इतक्या अडचणींचा सामना करावा लागला नाही.
– जयराम रमेश, काँग्रेस सरचिटणीस