लोकसभेचं आजच्या दिवसाचं (२ जुलै) कामकाज संपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रमुख व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. राहुल गांधी यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी ही भेट झाली. या भेटीवेळी शरद पवारांबरोबर महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांचे खासदार उपस्थित होते. भेटीत पवार आणि महाराष्ट्रातील खासदारांनी राहुल गांधी यांना पंढरपूरच्या वारीत (आषाढी वारी २०२४) सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं. यावेळी शरद पवारांबरोबर त्यांच्या पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील, सुरेश उर्फ बाळ्या मामा पाटील, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील आणि काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यादेखील उपस्थित होत्या.

या भेटीनंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. ते म्हणाले, “आज आम्ही शरद पवार यांच्या नेतृत्वात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली. या भेटीत शरद पवार यांनी राहुल गांधी यांना पंढरपूरच्या वारीचं निमंत्रण दिलं. तसेच पवारांनी राहुल गांधी यांना वारीचं महत्त्व समजून सांगितलं. त्याचबरोबर राहुल गांधींना वारीत सहभागी होण्याची विनंती देखील केली. आजच त्यांना निमंत्रण दिलं असल्यामुळे ते या वारीत कधी सहभागी होतील याबाबत नियोजन केलेलं नाही. नियोजन केल्यानंतर ते शरद पवारांना कळवतो असं म्हणाले आहेत. त्यानंतर ते महाराष्ट्रात येऊन पंढरपूरच्या वारीत सहभागी होतील. राहुल गांधी वारीसाठी महाराष्ट्रात आल्यावर कुठे थांबतील? कोणत्या नेत्याच्या घरी जातील? हे वारीच्या कोणत्या भागात ते सहभागी होणार त्यावर अवलंबून आहे. राहुल गांधी वारीसाठी येणार असतील तर शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा वारीचा मार्ग ठरेल.”

दरम्यान, धैर्यशील मोहिते पाटील यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. मोदी यांनी आज लोकसभेत राहुल गांधी यांचा ‘बालबुद्धी’ असा उल्लेख केला, त्यावर मोहिते पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “राहुल गांधी हे विरोधी पक्षांचे नेते आहेत, ते सभागृहातील नेते आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यावर इतक्या खालच्या पातळीवर जाऊन बोलणं चुकीचं आहे. त्यांनी देशाच्या विकासावर बोलायला हवं होतं. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर द्यायला हवं होतं. मात्र, पंतप्रधानांनी इतक्या खालच्या पातळीवर जाऊन लोकसभेत मत मांडणं खूप चुकीचं वाटतं.” खासदार धैर्यशील मोहिते पाटील साम मराठीशी बोलत होते.

हे ही वाचा >> “पंडित नेहरूंनी बाबासाहेब आंबेडकरांची राजकीय कारकीर्द संपवण्यासाठी…”, पंतप्रधान मोदींचे काँग्रेसवर आरोप

मोहिते पाटील म्हणाले, “सर्व विरोधी पक्षांनी मागणी केली होती की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूर मधील हिंसाचारावर, NEET पेपर लीक प्रकरणावर बोलावं, चर्चा करावी. परंतु, अधिवेशन कालावधीत त्यांनी किंवा मंत्रिमंडळातील कोणत्याही मंत्र्याने या मागणीची दखल घेतली नाही. तसेच देशभर ज्या विषयाची चर्चा होत आहे, त्यावर त्यांच्या संबंधित मंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे विरोधी पक्षांनी मोदींच्या भाषणाला विरोध केला.”