नवी दिल्लीत १८ व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन चालू असून आज (१ जुलै) या अधिवेशनाचा सहावा दिवस आहे. पहिल्या अधिवेशनात राष्ट्रपदी द्रौपदी मुर्मू यांनी केलेल्या अभिभाषणावर आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चर्चा चालू आहे. दरम्यान, आजचा दिवस हा विरोधी पक्षातील खासदारांचा असल्याचं दिसत आहे. कारण विरोधकांनी NEET पेपर लीक प्रकरणावरून सरकारला घेरलं. पाठोपाठ विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हिंदुत्वाचा मुद्दा, नुकतीच झालेली लोकसभा निवडणूक, अग्निवीर योजनेला देशभरातून होत असलेला विरोध, ईडी-सीबीआय व आयकर विभागाच्या धाडी तसेच इतर अनेक मुद्यांवरून सरकारला धारेवर धरलं.

यावेळी राहुल गांधी यांनी भर सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीत पराभूत करण्याचं आव्हान दिलं. राहुल गांधी म्हणाले, मोदीजी यावेळी आम्ही तुम्हाला गुजरातमध्ये हरवणार, तुम्ही हवं तर लिहून घ्या, विरोधकांची इंडिया आघाडी तुम्हाला गुजरातमध्ये हरवतेय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीचा प्रचार करत असताना अनेक वृत्तवाहिन्या व वृत्तसंस्थांना मुलाखती दिल्या होत्या. अशाच एका मुलाखतीत बोलताना मोदी म्हणाले होते की जगाला महात्मा गांधी माहिती नव्हते. महात्मा गांधींच्या जीवनावर आधारित ‘गांधी’ चित्रपट आला आणि जगाला महात्मा गांधी समजले. राहुल गांधी यांनी आज सभागृहात मोदींच्या या वक्तव्यावरून त्यांना टोला लगावला. तसेच मोदी यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं की त्यांचा जन्म जैविकरित्या झालेला नाही. त्यावरूनही राहुल गांधी यांनी मोदींचा चिमटा काढला.

राहुल गांधी म्हणाले, आपले पंतप्रधान थेट परमात्म्याशी संवाद साधतात. परमात्मा मोदींशी चर्चा करतो. आपण सगळे जैविकरित्या (बायोलॉजिकल) जन्माला आलो आहोत. आपला एक दिवस मृत्यू होणार आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी अजैविक (नॉन बायोलॉजिकल) आहेत. त्यांनी म्हटलं की महात्मा गांधींचा मृत्यू झाला आणि गांधी सिनेमा आला म्हणून जगाला त्यांची ओळख झाली. सिनेमामुळे गांधी जगाला समजले, असं त्यांना वाटतं. पण मी या सभागृहाला सांगू इच्छितो की महात्मा गांधींचा मृत्यू झालेला नाही ते आजही जिवंत (विचारांनी) आहेत.

हे ही वाचा >> राहुल गांधींच्या घणाघाती भाषणादरम्यान पंतप्रधान मोदींची एका वाक्यात प्रतिक्रिया, विरोधकांकडून ‘वाह, वाह’ म्हणत चिमटा

मोदी महात्मा गांधींबाबत नेमकं काय म्हणाले होते?

नरेंद्र मोदी म्हणाले होते, “महात्मा गांधी एक मोठं व्यक्तिमत्त्व होतं. आपण जगभरात त्यांची ओळख निर्माण करायला हवी होती. त्यांचे विचार, त्यांचा संदेश आप जगभरात पोहोचवायला हवा होता, ही आपली जबाबदारी होती. मात्र, आपण त्यात अपयशी ठरलो. त्यांना कोणीच ओळखत नव्हतं. मात्र महात्मा गांधींवर पहिल्यांदा चित्रपट बनला तेव्हा जगभराती लोकांना समजलं गांधी कोण आहे? त्यांच्याबद्दल जगभरात कुतूहल निर्माण झालं. त्यांची ओळख निर्माण करण्यासाठी आपण ७५ वर्षात काहीच केलं नाही.”